कोल्हापूर : महानगरपालिका निवडणूक अद्याप जाहीर व्हायची असली तरी, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीच्या तयारीत पुढे आहे. पक्षाने आपले उमेदवार सर्वात आधी जाहीर केले आहेत. पक्षीय पातळीवर नियोजन करण्याकरिता पक्षातर्फे एक समिती स्थापन करण्यात आली असून, समितीच्यावतीने प्रभागनिहाय सर्वेक्षण सुरू करण्यात आले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस अशा तीन पक्षांची महाविकास आघाडी आकाराला आली आहे. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत ही आघाडी राहणार नसली तरी, निवडणुकीनंतर तर कायम राहणार आहे. पक्षाचे कार्यकर्ते पक्षाबरोबर राहावेत, आपऱ्या कार्यकर्त्यांकडून गद्दारी करून विरोधकांना मिळू नयेत, म्हणून तिन्ही पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा आणि निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. जरी त्यांनी या निवडणुकीस ‘मैत्रीपूर्ण लढत’ असे सोयीचे नाव दिले असले तरी, खरी चुरस मात्र त्यांच्यातच होणार आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षात नेत्यांकडून सर्वाधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांना ‘नंबर एक’चा पक्ष म्हणून सभागृहात स्थान मिळवायचे आहे. त्यामुळे ऐनवेळी उमेदवारांची पळवापळवी देखील होण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांत तयारीला वेग आला आहे. राष्ट्रवादीने ८१ प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक प्रभागनिहाय उमेदवार शोधमोहीम त्यांनी सुरू केली आहे. प्रभागात स्थानिक नागरिक, कार्यकर्त्यांकडून उमेदवारांबाबत चाचपणी केली जात आहे. निवडणूक तयारीत त्यांनी सध्या तरी आघाडी घेतली आहे.
पक्षाची समिती जाहीर -
राष्ट्रवादीने निवडणुकीचे नियोजन करण्याकरिता ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, राजेश लाटकर, आदिल फरास, सुनील देसाई, उत्तम कोराणे, अजित राऊत, संजय कुऱ्हाडे, विनायक फाळके, संदीप कवाळे, महेंद्र चव्हाण यांची एक समिती स्थापन केली आहे.
शिवसेना एकटीच लढणार-
महाआघाडी असून देखील शिवसेना सध्या तरी एकाकी पडली असल्याचे चित्र आहे. शिवसेनेतील मतभेद असल्याने नेतेमंडळीत एकी राहिलेली नाही. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी आपली आपली घोडी पुढे नेत असल्यामुळे शिवसेनेला एकाकीच लढावे लागणार आहे. शिवसेनेत कडवट शिवसैनिक आहेत, पण निवडणूक जिंकण्याचे कौशल्य फार थोड्या शिवसैनिकांकडे आहे.