राम मगदूम -- गडहिंग्लज --राष्ट्रवादीचा वारू रोखण्यासाठी गडहिंग्लज तालुक्यातील सर्व विरोधक एकत्र येण्याच्या हालचालींना दोन दिवसांत वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर जनता दल, स्वाभिमानी, भाजप आणि अप्पी पाटील व हत्तरकी गटाची संयुक्त बैठक सोमवारी रात्री गडहिंग्लजमध्ये झाली.राष्ट्रवादीच्या विरोधात गेल्यावेळीही जनता दल-जनसुराज्य व काँगे्रसची आघाडी रिंगणात होती. मात्र, बाबासाहेब कुपेकर यांनी या आघाडीवर एकतर्फी मात केली होती. मात्र, त्यांच्या पश्चात होणाऱ्या या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला आव्हान देण्याची व्युहरचना विरोधकांत सुरू आहे. किंंबहुना, ‘राष्ट्रवादी हटाव’ या मुद्द्यावर ही मंडळी एकत्र येण्याची शक्यता आहे.गेल्यावेळी राष्ट्रवादीने तालुक्यातील पाचही जि. प. आणि दहांपैकी आठ जागा जिंकून पंचायत समितीची सत्ता अबाधित राखण्यात यश मिळविले होते. मात्र, कुपेकरांच्या पश्चात अंतर्गत मतभेदांमुळेच तालुक्यात प्रबळ असूनही पक्षासमोरील ‘कटकटी’ वाढल्या. बड्याचीवाडी आणि भडगाव गटातील उमेदवार निवडीचा गुंता अधिक जटील झाला आहे.गडहिंग्लज कारखान्याप्रमाणेच या निवडणुकीतही एकत्र येण्याच्या हालचाली राष्ट्रवादी व जनता दलात सुरू आहेत. मात्र, जि. प.च्या नूल जागेचा प्रश्न प्रलंबित आहे. दरम्यान, हत्तरकी गटाशी युती करून बेरजेत बाजी मारलेल्या स्वाभिमानीच्या राजेंद्र गड्यान्नावर यांनी श्रीपतराव शिंदे यांच्यासह जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, भाजपचे प्रकाश चव्हाण या तिघांनाही चर्चेसाठी सोमवारी एकत्र आणले.मात्र, त्याचदिवशी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये गिजवणे व नेसरी या महत्त्वाच्या गटांतील उमेदवारांचा समावेश आहे. हे दोन गट सोडून चर्चा व्हावी, अशी भाजपची अपेक्षा आहे. त्यामुळेच सांगोपांग चर्चा होऊ शकली नाही. मात्र, एकत्र येण्याबरोबर सर्वांनीच अनुकूलता दाखविली. त्यामुळेच सर्वसमावेशक विरोधी आघाडीची शक्यता निर्माण झाली आहे. तसे झाले तर ‘प्रबळ राष्ट्रवादी’ला गडहिंग्लजमध्ये अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागेल, एवढे मात्र निश्चित.काय झाली चर्चा !भाजपने नेसरीतून हेमंत कोलेकर व गिजवणेसाठी संजय बटकडली यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हे दोन गट सोडून उर्वरित भडगाव, हलकर्णी व नूल या तीन गटांच्या जागावाटपाबाबत चर्चा व्हावी, असे भाजपचे म्हणणे आहे. मात्र, त्यास इतरांची तयारी नाही.पाचही गटांतील जागावाटपाबाबत मतदारसंघनिहाय प्रत्येकाची ताकद आणि निवडून येण्याची क्षमता यासंदर्भात विचारविनियम होऊन जागा वाटप आणि उमेदवारांच्या निवडीवर बैठकीत एकमत झाल्याचे समजते. त्यामुळेच विरोधकांच्या हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
‘राष्ट्रवादी’चे विरोधक एकत्र?
By admin | Published: February 01, 2017 12:14 AM