कोल्हापूर : राष्ट्रीयीकृत बँकेच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच आता या बँकांचे कामकाज सुरू होणार आहे. उद्या, शुक्रवारपासूनच याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक राहुल माने यांनी दिली.दुसरा आणि चौथ्या शनिवारी तसेच दर रविवारी बँकांना सुट्टी असते. यामध्ये काही सण आल्यास सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांची गैरसोय होते. बहुतांश बँका सकाळी ११ वाजता सुरू होत होत्या. आता नवीन नियमानुसार दोन तास जादा वेळ बँका सुरू राहणार असल्याने याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. या निर्णयाचे स्वागत होत आहे.
केंद्र शासनाच्या ‘ईज’ अन्वये बँकिंगमधील सुधारणांतर्गत ग्राहकांसाठी राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखांच्या वर्गीकरणानुसार कामकाजाची वेळ एकसमान केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशनने ६ आॅगस्टच्या पत्राद्वारे ग्राहकांसाठी देशामधील राष्ट्रीयीकृत बँक शाखांच्या वेळेचे तीन प्रकारे वर्गीकरण केले असून, ते आता देशभर लागू होणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीने ‘आयबीए’चा आदेश आणि जिल्हा बँक व्यवस्थापकांनी प्रत्येक सार्वजनिक बँकेने सूचना केल्यानुसार जिल्ह्यातील सार्वजनिक बँकांसाठी पुढीलप्रमाणे कामकाजाच्या वेळेत तीन प्रकारे वर्गीकरण केले आहे.अशा असतील वेळा
- रहिवासी क्षेत्र- बँकांची वेळ - सकाळी ९ ते दुपारी ४,
- ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३.
- व्यापारी क्षेत्र- बँकांची वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी ६,
- ग्राहकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५.
- इतर व कार्यालयासाठी- सकाळी १० ते सायंकाळी ५,
- ग्राहकांसाठी सकाळी १० ते दुपारी ५.
- जेवणाची सुट्टी - अर्धा तास
- जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक शाखा - २४५