लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकरी आंदोलन, पेग्यासस हेरगिरी, सरकारी मालमत्तेचे खासगीकरण, कामगार कायद्यात बदल, वाढती बेरोजगारी, वाढते इंधन दर, कोविड लसीकरण दिरंगाई, महागाई या प्रमुख प्रश्नांना घेऊन देशभरातील १९विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहेत.
२० ते ३० सप्टेंबर या दरम्यान देशभर आंदोलन होणार आहे, असे विरोधी पक्षाच्या वतीने झालेल्या ऑनलाईन बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करून आंदोलनाची दिशा स्पष्ट केली आहे. यात राज्याराज्यांत असलेली कोविडविषयक बंधनांची परिस्थिती पाहून संबंधित राज्यांतील पक्ष आंदोलनाचे स्वरूप ठरवतील. धरणे, निदर्शने, हरताळ आदी स्वरूपाचे आंदोलन असू शकते.
चौकट
उठा, देशाचे रक्षण करा
आम्ही १९ विरोधी पक्षांचे नेते भारतीय जनतेला हाक देत आहोत. उठा, आपल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेचे सर्वशक्तीनिशी रक्षण करूया; उद्याचा चांगला भारत घडवण्यासाठी आज त्याचे रक्षण करूया, असे आवाहन विरोधी पक्षाने देशाच्या जनतेला केले आहे.
चौकट
आंदोलनातील सहभागी पक्ष
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP), तृणमूल काँग्रेस (TMC), द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK), शिवसेना (SS), नॅशनल कॉन्फरन्स (NC), झारखंड मुक्ती मोर्चा (JMM), पीपल्स डमोक्रॅटिक पार्टी (PDP), राष्ट्रीय जनता दल (RJD), राष्ट्रीय लोकतांत्रिक दल (RLD), अखिल भारतीय संयुक्त गणतांत्रिक मोर्चा (AIAUDF), लोक जनता दल (LJD), भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI), क्रांतिकारी समाजवादी पक्ष (RSP), केरळ काँग्रेस - मणी (KCM), इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML), मुक्तिवादी पॅंथर्स पार्टी (VCK), धर्मनिरपेक्ष जनता दल (JDS), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M).