कोल्हापूर: एडस् नियंत्रण सोसायटीच्या देशभरातील सर्वकर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी १ सप्टेंबर २०२२ पासून असहकार आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे अहवाल पाठवणे बंद झाले असून कामकाज ठप्प झाले आहे. महाराष्ट्रात याविभागामध्ये सुमारे २ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.भारतामध्ये एड्सचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एड्स नियंत्रणाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात १९९२ साली झाली. नॅशनल कंट्रोल ऑर्गनायझेशन (NACO) या देश पातळीवरील विभागाच्यावतीने राज्यपातळीवर राज्य एड्स नियंत्रण संस्थांची स्थापना करण्यात येऊन या कार्यक्रमांतर्गत कंत्राटी तत्त्वावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या भारतामध्ये एप्रिल २०२१ पासून एड्स नियंत्रणाच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली आहे.आयसीटीसी, डाप्कू, एआरटी रक्तपेढी जिल्हास्तरावर असे विभाग स्थापन करून या अंतर्गत कामकाज चालविले जाते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तीला समुपदेशनाचा फार मोठा आधार असतो. या कार्यक्रमांतर्गत जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, पर्यवेक्षक, समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डॉक्टर्स माहिती सहाय्यक, अकौंटट, औषध निर्माता, माहिती व्यवस्थापक, परिचारीका इत्यादी विविध पदावर एम.एस.डब्ल्यू., डी.एम.एल.टी. अशा उच्च शैक्षणिक पदवी धारकांची नेमणूक कंत्राटी तत्त्वावर करण्यात आलेली आहे.गेली वीस वर्षापासून हे कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर काम करत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना असणाऱ्या कोणत्याही सोयी सुविधांचा लाभ या कर्मचाऱ्यांना मिळत नाही. नोकरीमध्ये कोणतीही हमी नाही. महाराष्ट्रामध्ये साधारणपणे २ हजार कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून त्यांनी एडस् नियंत्रणामध्ये मोठी भूमिका बजावली आहे.
एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांचे देशभर 'असहकार आंदोलन', कामकाज ठप्प
By समीर देशपांडे | Published: September 28, 2022 2:14 PM