गतवर्षी कोरोनाने हाहाकार उडाला होता. सरकारने सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया राबविली होती. कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आल्यानंतर नोव्हेंबरनंतर कोरोनाचा कहर कमी झाला होता. सध्या पुन्हा एकदा कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आहे. बारा रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. मात्र, नागरिकांनी शासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. जयसिंगपूर शहरातील आठवडी बाजारात फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. गर्दी करू नका, मास्कचा वापर करा, असे नगरपालिका प्रशासन सातत्याने ध्वनिक्षेपाद्वारे आवाहन करीत असतानाही आठवडा बाजारात मोठी गर्दी वाढू लागली आहे.
तालुक्याचा केंद्रबिंदू असलेला जयसिंगपूरचा आठवडी बाजार रविवारी भरतो. त्यामुळे पालिका प्रशासन व पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली जात आहे.
चौकट - बाजारासाठी पर्यायी जागेची गरज
शहरातील रस्त्यावरच्या बाजाराला पर्यायी जागा देण्याची गरज आहे. जयसिंगपूरसह आसपासच्या खेड्यातील विक्रेत्यांबरोबर नागरिकही येत असल्याने बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरीच्या घटना घडतात. वाहतूक कोंडीदेखील होते. त्यामुळे नगरपालिकेने आठवडी बाजारासाठी सुसज्ज जागा शोधावी, अशी मागणी हाते आहे.
फोटो - ०७०३२०२१-जेएवाय-०६
फोटो ओळ - जयसिंगपूर शहरात रविवारी आठवडी बाजारामध्ये ग्राहकांची खरेदीसाठी झालेली गर्दी.