गणपती कोळी -- कुरुंदवाड --येथील शहराच्या मध्यभागी असलेल्या तबक उद्यानात पावसाचे पाणी साचले असून, या उद्यानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. त्यातच शेजारील मार्केटमधील कचरा टाकल्याने तो कुजून दुर्गंधी सुटली आहे. परिणामी, उद्यानातील पूर्णपणे पाणी निचरा होण्यासाठी नियोजनाची गरज आहे.संस्थानकाळापासून तबक उद्यान म्हणून प्रसिद्ध असलेल्या या उद्यानात पालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून सौंदर्य बदलले आहे. जमिनीपासून सात ते आठ फूट खोली असलेल्या या उद्यानाला मैदान बनविले असून, पाच वर्षांपूर्वी जिम्नॅशिअम हॉल व मैदानाभोवती भव्य प्रेक्षक गॅलरी उभारली आहे. पावसाळ्यात मैदानातील पाणी भुयारी गटारीतून सायफन पद्धतीने पाणी काढण्याचे नियोजनही केले आहे. त्यासाठी पालिकेने लाखो रुपये खर्ची घातले आहेत. सुसज्ज जिम्नॅशिअम हॉल, मोठे मैदान व भव्य प्रेक्षक गॅलरी याची शहराच्या वैभवात भर पडली असून, या मैदानावर वर्षभरात अनेकवेळा राज्यस्तरीय कबड्डी, खो-खो, व्हॉलिबॉल, क्रिकेट यासारख्या स्पर्धा भरविल्या जातात.गत आठवड्यात झालेल्या पावसामुळे मैदान पूर्णपणे पाण्याने भरून राहिले आहे. त्यामुळे मैदानाला तळ्याचे स्वरूप आले आहे. पालिकेने मैदानातील पाणी सायफन पद्धतीने जाण्यासाठी लाखो रुपये खर्चून ड्रेनेज काढले आहे. मात्र, चुकीच्या नियोजनामुळे मैदानातील पाणी निघत नाही. या मैदानालगत भाजी मंडई असून, व्यापारी बाद झालेली भाजी गॅलरीतून थेट मैदानात टाकत असल्याने ती पाण्यात कुजून दुर्गंधी सुटली आहे. पाणी तुंबल्यामुळे डासांची उत्पत्ती होत असून, परिसरातील नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. दरम्यान, पालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. पावसाळ्यात मैदानातील पाणी सायफन पद्धतीने बाहेर जाण्यासाठी ड्रेनेज काढली आहे. त्यासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, इंजिनिअरचे चुकीचे काम, पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे सायफन गटार योजना कुचकामी ठरली आहे. साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असून, मुख्याधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून मैदानात पाणी साचू नये यासाठी कायमस्वरूपी नियोजन करणे गरजेचे आहे.- सुरेश कडाळे, नगरसेवक, कुरुंदवाड नगरपरिषद
कुरुंदवाडच्या तबक उद्यानाला तळ्याचे स्वरूप
By admin | Published: July 20, 2016 11:25 PM