कोल्हापूर : कोल्हापुरात सकल मराठा समाजातर्फे आज, शनिवारी भव्य मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चासाठी सुमारे ३५ लाख मराठाजन उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोर्चाच्या प्रमुख मार्गांची शुक्रवारी पाहणी केली. सुमारे साडेतीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी रस्त्यांवर उतरले आहेत. मराठा समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात राज्यभर मराठा क्रांती मूक मोर्चे निघत आहेत. त्यामध्ये मराठा समाज सहभागी होऊन रस्त्यांवर उतरत आहे. आज, शनिवारच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रातील सांगली, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर ग्रामीण येथून पोलिसांची जादा कुमक दाखल झाली. सकाळी ११ वाजता पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. सैनी, पोलिस अधीक्षक देशपांडे व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दुपारनंतर मोर्चाच्या विविध मार्गांची, विशेषत: ताराराणी पुतळा, दसरा चौक, गांधी मैदान, जिल्हाधिकारी कार्यालयासह ४० वाहनतळांची पाहणी केली. (प्रतिनिधी) असा आहे पोलिस बंदोबस्त विशेष पोलिस महानिरीक्षक - १ पोलिस अधीक्षक - १ अप्पर पोलिस अधीक्षक - ८ पोलिस उपअधीक्षक - १९ पोलिस निरीक्षक - ५५ सहायक पोलिस निरीक्षक - १८० पोलिस कर्मचारी (पुरुष) - १५०० पोलिस कर्मचारी (महिला) - ४०० वाहतूक पोलिस - ४०० राज्य राखीव दलाच्या तुकड्या (दोन) - २०० विशेष कृती दलाच्या तुकड्या (तीन)- ६० गृहरक्षक दलाच्या तुकड्या (तीन) - ६० बॉम्बशोध पथके - ५
कोल्हापूर शहराला पोलिस छावणीचे स्वरूप
By admin | Published: October 15, 2016 12:44 AM