सांगली : येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ताब्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे शुक्रवारीही कॉलेज कॅम्पसमध्ये तणाव कायम होता. प्रवेशद्वारापासून संचालकांच्या कार्यालयापर्यंत मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. दरम्यान, संचालक डॉ. जी. व्ही. परिशवाड यांनी कामकाजाला सुरुवात केली असून, गेल्या महिन्याभरातील आर्थिक व्यवहारांची तपासणी त्यांनी हाती घेतली आहे. ‘वालचंद’च्या मालकी हक्कावरून अजित गुलाबचंद यांचे नियामक मंडळ व महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एमटीई) यांच्यात वाद निर्माण झाला आहे. महिन्याभरापूर्वी नियामक मंडळातर्फे नियुक्त संचालक परिशवाड यांना हटवून त्यांच्या जागी एमटीईतील एका गटाचे अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी एस. जी. देवमाने यांची नियुक्ती केली होती. परिशवाड यांना दमदाटी, गुंडागर्दी करून हटविण्यात आल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर गुरुवारी ‘भाजप’चे खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेत्यांनी देवमाने यांची उचलबांगडी करीत पुन्हा परिशवाड यांच्याकडे महाविद्यालयाची सूत्रे सोपवली. महाविद्यालयाच्या ताब्यावरून खासदार पाटील व भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात जुंपली आहे. शुक्रवारीही महाविद्यालयाच्या परिसरात तणाव कायम होता. दोन्ही प्रवेशद्वारांवर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. संचालकांच्या कार्यालयाबाहेरही २० ते २५ पोलिस तैनात करण्यात आले आहेत. महाविद्यालयाला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यात महाविद्यालयात पदविका (डिप्लोमा) विभागाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र, येथील वातावरणामुळे अभियंता होण्याची स्वप्ने बाळगून प्रवेश घेण्यासाठी आलेले विद्यार्थी, पालक यांच्या चेहऱ्यावरही तणाव दिसत होता. परिशवाड यांनी प्रत्यक्षात कामकाजाला सुरुवात केली असून, गेल्या महिन्याभरात देवमाने यांच्या कालावधीतील आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू केली आहे. या कालावधीतील पदविका प्रवेश व वसतिगृहाच्या शुल्काची रक्कम अलाहाबाद बँकेत ठेवण्यात आली आहे. ही रक्कम सुमारे ३० लाखांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ही रक्कम दुसऱ्याच बँकेत ठेवली जात असे. त्याशिवाय आणखी काही आर्थिक व्यवहार झाले का, याचीही चौकशी सुरू केली आहे. या छाननीनंतर नियामक मंडळ पुढील कारवाई करेल, असे महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)आज दिवसभरातसंचालक कार्यालयासह तिजोरीची कुलुपे बदललीदेवमाने यांच्या नावाचे फलक, स्टीकर काढलेभाजप नेते दीपक शिंदे-म्हैसाळकर, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास पाटील महाविद्यालयात थांबूनसंजयकाका पाटील समर्थकांची हजेरीएमटीईचे सुरक्षारक्षक बदलण्याच्या हालचालीपदविकेची प्रवेश प्रक्रिया सुरळीतकोटवालचंद महाविद्यालयाच्या संचालकपदाची सूत्रे महिन्याभरानंतर हाती घेतली आहेत. या कालावधीत काही आर्थिक व्यवहार झाले असून, त्यांची छाननी सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे पगार, व्यवस्थापनाच्या खर्चाची तरतूद केली आहे. पदविका विभागाची प्रवेश प्रक्रियाही सुरळीत सुरू आहे. - डॉ. जी. व्ही. परिशवाड, संचालक, वालचंद महाविद्यालय
‘वालचंद’ला पोलिस छावणीचे स्वरूप
By admin | Published: June 25, 2016 12:34 AM