कोल्हापूर : कागल नगरपालिका निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल दाखल केलेल्या गुन्ह्यातून ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्यासह आठजणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
कागल नगरपालिकेच्या १० नोव्हेंबर २०१६ च्या निवडणुकीत अलका मर्दाने यांचा उमेदवारी अर्ज माघार घेतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी व तत्कालीन प्रांताधिकारी मनीषा कुंभार याना जिवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार झाली होती. तसेच, विनाकारण बेकायदेशीररीत्या जमाव जमवून निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनात घुसून सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार मुश्रीफ, माने, गाडेकर यांच्यासह इरफान मुजावर, रमेश माळी, अशोक जकाते, विक्रम जाधव, आशाकाकी माने यांच्यावर दाखल केली होती.
या प्रकरणाची सुनावणी एस. एस. जगताप यांच्या न्यायालयात चालून यामध्ये फिर्यादी संजय वळवी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी टीना गवळी, निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्या साक्षी झाल्या. मुश्रीफ यांच्यासह आठजणांच्या वतीने ॲड. गिरीश के. नाईक यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला व या सर्वांची निर्दोष मुक्तता झाली.