लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या सत्तेसाठी चढाओढ सुरू असतानाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यातही एकापेक्षा एक पुढे आहेत. संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांनी सर्वाधिक आठ तर ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, आमदार राजेश पाटील, अंबरीश घाटगे, ‘बिद्री’चे संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी स्वत:सह कुटुंबाच्या नावाने प्रत्येकी सहा अर्ज दाखल केले आहेत. छाननीत एक अर्ज बाद ठरला तर दुसरा असावा म्हणून बहुतांश इच्छुकांनी तीन-चार अर्ज भरले आहेत.
‘गोकुळ’चे संचालक पदाला वेगळी प्रतिष्ठा असल्याने ते पदरात पाडून घेण्यासाठी दिग्गज सगळी राजकीय ताकद पणाला लावतात. उमेदवारी मिळवण्यासाठी चढाओढ पहावयास मिळते, त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यातही मागे पडत नाहीत. ‘गोकुळ’चा उमेदवार अर्ज सोपा आहे, उमेदवाराचे नाव, पत्ता, वय, व्यवसाय, आधार क्रमांक या प्राथमिक माहितीसह कोणत्या गटातून अर्ज दाखल करता, सूचक, अनुमोदन, त्यांचा यादीतील अनुक्रमांक व स्वाक्षरी एवढीच माहिती भरावी लागते. त्याच्यासोबत मात्र ‘गोकुळ’च्या पोटनियमानुसार कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. तरीही एका एका इच्छुकाने किमान तीन-चार अर्ज दाखल केले आहेत. नविद मुश्रीफ यांनी स्वत:च्या नावाचे आठ, आमदार राजेश पाटील यांनी स्वत: व पत्नीच्या नावाने प्रत्येकी तीन, विश्वास पाटील यांनी स्वत: पाच तर सुपुत्र सचिन यांनी एक असे सहा तर प्रवीणसिंह पाटील यांनी स्वत: चार व पत्नी सुहासिनीदेवी यांचे दोन असे सहा अर्ज दाखल केले. अंबरीश घाटगे यांनी स्वत:च्या नावाने चार तर आईच्या नावे दोन अर्ज दाखल केले. त्यांच्यापाठोपाठ धैर्यशील देसाई यांनी स्वत:चे दोन, पत्नी अर्चना यांचे दोन तर बंधू राहुल यांचा एक असे पाच अर्ज भरले.
अरुण नरके यांनी अर्ज भरला
‘गोकुळ’ म्हटले की, आनंदराव पाटील-चुयेकर व अरुण नरके असे समीकरण गेली पन्नास वर्षे आहे. पाटील-चुयेकर यांच्या निधनानंतर तितक्या अनुभवाचे म्हणून नरके यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, ही निवडणूक स्वत: न लढवता मुलगा चेतन यांना संधी देण्याचा निर्णय घेतला, तरीही त्यांनी अर्ज दाखल केला.
स्वत:सह कुटुंबातील व्यक्तींच्या दाखल केलेल्या अर्जांची संख्या
नविद मुश्रीफ -८
विश्वास पाटील -६
अंबरीश घाटगे -६
आमदार राजेश पाटील -६
प्रवीणसिंह पाटील-मुरगूडकर -६
धैर्यशील देसाई -५
किशोर पाटील-शिरोलीकर -५
अभिजीत तायशेटे -५
तानाजी पाटील (गडमुडशिंगी)-५
प्रतापसिंह पाटील-कावणेकर -५
चेतन नरके -५
रणजीतसिंह कृ. पाटील, अरुण डोंगळे, शशिकांत पाटील-चुयेकर, सदाशिव चरापले, हिंदूराव चौगले, विजयसिंह मोरे, विश्वास जाधव, पी. डी. धुंदरे, रमा बोंद्रे, बाळ कुपेकर प्रत्येकी ४.