कोल्हापूर : घटस्थापना, तोफेची सलामी, अभिषेक, आरती...सिंहासनारुढ पूजा आणि भाविकांच्या मांदियाळीत आज, सोमवारपासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी देवीचे अलौकिक रुप डोळ्यात साठवत भाविकांनी अंबा माता की जयचा गजर केला. देवी राजेश्वरी या रुपात भक्तांना मनोवांछित फल देण्यासाठी विराजमान झाली आहे.. म्हणून पहिल्या माळेला सिंहासनारुढ रुपात अंबाबाईची पूजा बांधण्यात आली.दुष्टांचा संहार, सज्जनांचा उद्धार, भक्तांवर आपल्या शुभाशिर्वादाच्या मायेचा पदर धरणाऱ्या आदिशक्तीचा, स्त्रीशक्तीचा जागर म्हणजे नवरात्रोत्सव. कोल्हापुरातील श्री अंबाबाई म्हणजे शिवपत्नी देवी सतीचे नेत्र पडलेले स्थान. भारतातील ५१ आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील ही प्रमुख देवता. म्हणूनच अंबाबाईचा नवरात्रोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे. सोमवारी पहाटे देवीची काकड आरती, अभिषेक, त्यानंतर सकाळची आरती झाल्यानंतर घटस्थापना झाली. साडे आठ वाजता तोफेच्या सलामीने घट घालण्यात आले आणि अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली.
भक्तांच्या मांदियाळीत अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ, पहिल्या माळेला सिंहासनारुढ रूपात पूजा
By इंदुमती सूर्यवंशी | Published: September 26, 2022 5:22 PM