कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला (शुक्रवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची माहेश्वरी देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवी शिवशक्ती स्वरुपिणी आहे.मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यामध्ये या देवतेचा उल्लेख येतो. मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली, त्यातील माहेश्वरी ही एक मातृका आहे.
देवी महात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला शुंभ निशुंभांच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या त्यात माहेश्वरीचा उल्लेख येतो. शिवाचे स्वरुप धारण करणारी शक्ती म्हणून ती वृषारुढा-बैलावर आरुढ झालेली आहे. जटा हेच तिचे मुकुट आहे.
व्याघ्रचर्म धारण करणारी, त्रिशुल-डमरु-सर्प आणि अक्षमाला धारण करणारी, त्रिनेत्रा, मस्तकावर चंद्रकोर असे तिचे स्वरुप आहे. हिला संध्यावंदनामध्ये सामवेदरुपी सायंगायत्री म्हणजेच संध्याकाळच्या सूर्याची देवता मानतात. ही पूजा सारंग मुनिश्वर, मंदार मुनिश्वर, सचिन गोटखिंडीकर यांनी बांधली.गर्दीचा ओघ कायमअंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकाचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. पहिल्या दोन दिवसातच तीन लाखांहून अधिक भाविकांची नोंद झाली होती. शुक्रवार हा देवीउपासनेचा वार असल्याने यादिवशी पहिल्या दोन दिवसांपेक्षा जास्त गर्दी होती. उद्या दुसरा शनिवार आणि रविवार असे सलग सुट्ट्या आल्याने या दोन दिवसांत उच्चांकी गर्दी होणार आहे.