कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या माळेला (गुरुवार) करवीर निवासिनी श्री अंबाबाईची ब्राम्ही देवीच्या रुपात पूजा बांधण्यात आली. ही देवता ब्रम्हदेवाचे स्त्री रुप असून ती सप्तमातृकांपैकी एक आहे.नवरात्रौत्सवाच्या दुस-या दिवशी श्री अंबाबाईचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर ब्राम्ही देवीच्या रुपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. मत्स्यपुराण, महाभारत, देवीमहात्म्यात या देवतेचा उल्लेख येतो.मत्स्यपुराणानुसार शिवाने अंधकासुराच्या नाशासाठी मातृकांची निर्मिती केली त्यातील ब्राह्मी ही एक मातृका. देवीमहात्म्यानुसार महासरस्वती अथवा कौशिकीच्या मदतीला, शूंभ-निशुंभाच्या विरोधात ज्या मातृका निर्माण झाल्या त्यात ब्राह्मीचा उल्लेख येतो.
या देवतेला चार मुख असून चौथे मुख मागील बाजूस आहे. देवतेच्या जटा हाच मुकूट आहे. ही देवी रक्तवर्ण, चर्तुर्भूज, अक्षयमाला, स्त्रुव, स्त्रुक, कमंडलू धारण करणारी आणि हंसवाहिनी आहे.
हिला संध्यावंदनामध्ये ऋग्वेदरुपी प्रार्तगायत्रीचे स्वरुप म्हणजेच सकाळच्या सुर्याची देवता मानले जाते. ही पूजा अनिल गोटखिंडीकर, सचिन गोटखिंडीकर, अमोल गोटखिंडीकर यांनी बांधली.