कोल्हापूर : शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवशी रविवारी करवीर नवदुर्गा द्वितीय अवतार श्री मुक्तांबिका (गजेंद्रलक्ष्मी) देवीला करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून मानाचा विडा व ओटी अर्पण करण्याची परंपरा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर पुन्हा सुरू करण्यात आली.मंगळवार पेठेतील श्री स्वामी विवेकानंद आश्रम संस्थेच्या अधिपत्याखालील श्री मुक्तांबिका मंदिरात शारदीय नवरात्रीत करवीर संस्थानची आई तुळजाभवानी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी क्षेत्रस्थ देवतांना भेटीस जात असते. ही पालखी याच करवीरक्षेत्री असणाऱ्या साठमारी गल्लीतील श्री मुक्तांबिका देवीच्या भेटीला यायची.
करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून देवीला मानाचा विडा व ओटी अर्पण केली जायची; परंतु काळाच्या ओघात ही परंपरा खंडित झाली होती. ती सेवा ३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर यंदाच्या वर्षी पुन्हा सुरू करण्यात आल्याने भाविकातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. श्री मुक्तांबिका देवीची आकर्षक पूजा रविवारी अन्नपूर्णा रूपात पुजारी वैभव विश्वास माने यांनी बांधली होती.रविवारी श्री मुक्तांबिका देवीस करवीर संस्थानचे चोपदार यांच्याकडून मानाचा विडा व ओटी अर्पण करण्यात आली. त्यावेळी चोपदार, मानकरी यांच्यासह श्री स्वामी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आनंदराव पायमल, विश्वस्त चंद्रकांत देसाई, मनोहर साळोखे यांच्यासह अमर साळोखे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.