जहाँगीर शेख ल्ल कागल पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शाहू आघाडीने निवडणूक लाढविण्याची तयारी सुरू केली आहे. या दोन्ही बैठका पाठोपाठ झाल्या असून, आमदार हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, तर छ. शाहू कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी शाहू आघाडीच्या कार्यकर्त्यांना पालिका निवडणुकीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच निवडणूक लढविण्याबद्दल प्राथमिक तयारी काय असावी, याबद्दल कार्यकर्त्यांची मतेही जाणून घेतली आहेत. हे दोन्ही गट पालिकेत सत्ताधारी गट आहेत. वास्तविक निवडणुकीसाठी पहिल्यांदा विरोधी गटाने रणशिंग फुंकणे अपेक्षित असते. कारण सत्तेत नसल्याचा फायदा, सहानुभूती त्यांना असते. मात्र, कागल शहरात सत्ताधारी आघाडी प्रबळ आणि एकसंघ असता विरोधी छावणीत सामसूम आहे. त्यांच्यात एकसंधपणाचाही अभाव आहे. ‘मुश्रीफ गटाला विरोध’ हेच तत्त्व कागल शहरात विरोधी गट आचरणात आणतो. त्यामुळे आघाडी कशी आणि कोणाबरोबर होणार? याचा अंदाज येत नसल्याने विरोधकांत नेमकी भूमिका ठरविताना दिरंगाई होत आहे. परिणामी, या प्रमुख दोन गटांनी तयारी सुरू केली असताना शहरातील मंडलिक गट, संजय घाटगे गट, भाजप, सेना, स्वाभिमानी संघटना, आरपीआय हे लहान-मोठे गट, पक्ष तटस्थपणे हालचाली बघत आहेत. इच्छुकांनी स्वत:पुरती तयारी केली आहे; पण तो त्यांचा वैयक्तिक ताकतीचा-प्रतिमेचा भाग आहे. प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित ४राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी नवीन मतदान नोंदणी कार्यक्रम राबवावा, यासाठी प्रभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करुन युवकांनी मतदान म्हणून मोठ्या प्रमाणात नोंद करण्याचे ठरले आहे. ४नवीन मतदार नोंदणी हा आ. मुश्रीफ यांचा कार्यपद्धतीचा जुना पण प्रसिद्ध पॅटर्न आहे, तर शाहू आघाडीच्या बैठकीत समरजितसिंह घाटगे यांनी उत्स्फूर्त संभाषण करुन पुढील निवडणुकीच्या तयारीचे टप्पे सांगितले. ४प्रभागनिहाय प्रमुख कार्यकर्त्यांच्या समिती तयार करुन व्यूहरचना केली जाणार आहे. मतदान नोंदणी, फेरफार नावे वाढविणे, कमी करणे याची तयारी केली जात आहे. दाखल्याची तयारी सुरू ४नगरपालिका निवडणुकीत प्रभाग आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी जातीचे दाखले काढण्यासाठी तयारी सुरु केली आहे. ४नेतेमंडळींनीही संभाव्य उमेदवारांना दाखल्याची तयारी कर, असे सूतोवाच केले आहे; तर काहीजण नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची वाट पाहत आहेत. प्रामुख्याने ओबीसी दाखल्यासाठी हा जोर सुरु आहे.
कागलला राष्ट्रवादी-शाहू आघाडीकडून मोर्चेबांधणी
By admin | Published: July 14, 2016 12:36 AM