Hasan Mushrif: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चिंतन शिबिर झाले. यामधून पक्षाचे नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांच्यासह अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होणे, शरद पवार यांचा राजीनामा यांसह अनेक मुद्द्यांवर मोठे गौप्यस्फोट केले. तसेच अजित पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्या जागांवर लढणार याबाबत काही स्पष्ट संकेत दिले. यानंतर आता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला आमच्या भूमिकेवर प्रामाणिक राहावे लागेल, असे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना हसन मुश्रीफ यांनी चिंतन बैठकीनंतर झालेल्या टीकांवर उत्तरे देताना काही भूमिका स्पष्ट केली. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना हसन मुश्रीफ म्हणाले की, ज्या पक्षात इतकी वर्ष काम केले, तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात. हिमतीचा विषय नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावे लागेल
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी कोणत्या जागांवर लढणार हे स्पष्टपणे सांगितले आहे. त्यानंतरही आता अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित बसून यावर निर्णय घेतील. प्रफुल्ल पटेल यांनी २००४ पासूनचा घटनाक्रम सांगितला आहे. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करायची आवश्यकता नाही. पण यावरून अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप युतीसाठी चर्चा, प्रयत्न सुरू होते, हे दिसून येते. आम्ही एक राजकीय भूमिका आता घेतली आहे आणि त्या भूमिकेशी आम्हाला प्रामाणिक राहावे लागेल. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करून ते सिद्ध करावे लागेल. अन्य राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल काही लागले तरी लोकसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार नाही, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
दरम्यान, अनिल देशमुख यांच्याबाबत अजित पवार यांनी गौप्यस्फोट केला. यावर बोलताना, अजित पवारांनी जे सांगितले ते वस्तूस्थितीला धरून आहे. आमच्यासोबत अनिल देशमुख होते. नंतर त्यांनी नकार दिला, त्यांनी इतके खोटे बोलू नये. अजितदादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. शरद पवार का नकार देत आहेत हे अजित पवार यांना कळलेले नाही, मग आम्हाला कसे कळणार? असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.