कोल्हापूर : कोल्हापूर उत्तरमधून माजी आमदार मालोजीराजे छत्रपती निवडणूक लढविणार नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉँग्रेस लढवेल व पक्षाचे उमेदवार शहराध्यक्ष आर. के. पोवार असतील, अशी घोषणा आज, गुरुवारी जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली. यासह विधानसभेची आणखी एक जागा वाढवून घेऊ, असे सुतोवाचही त्यांनी यावेळी केले.राजारामपुरी येथील कमला कॉलेजच्या व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष व नामदार हसन मुश्रीफ फौंडेशनतर्फे ‘गणराया अॅवॉर्ड-२०१३’चा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.मुश्रीफ म्हणाले, आर. के. पोवार हे पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षासाठी खळ-पोस्टर लावण्याचेही काम केले आहे. त्यांची एखाद्या महामंडळावर वर्णी लावावी अशी इच्छा होती; परंतु महामंडळांच्या नियुक्त्याच झाल्या नसल्याने शक्य झाले नाही; परंतु त्यांना बाजार समितीच्या अशासकीय मंडळाचे अध्यक्ष करून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मालोजीराजे छत्रपती यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस या मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. येथून आर. के. पोवारच पक्षाचे उमेदवार असतील. त्यांना उमेदवारी देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू.ते पुढे म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढल्याने शहराच्या विकासासाठी राज्य शासनाकडून निधी आणता आला. गणेश मंडळातून कार्यकर्ते घडतात. त्यातूनच नगरसेवक व आमदारही होतात. कारण समाजाचे खरे चित्र सुजाणपणे पाहणारे हे कार्यकर्ते असतात. महापौर तृप्ती माळवी म्हणाल्या, गणेशोत्सव मंडळांनी हा सण साजरा करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी. पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी मूर्तिदान करून लोकांनी सहकार्य करावे. गणराया अॅवॉर्डसारख्या स्पर्धेत पुढील वर्षी महिलांनाही समाविष्ट करावे. यावेळी शहराध्यक्ष आर. के. पोवार, नगरसेवक आदिल फरास, फौंडेशनचे शहराध्यक्ष सुनील महाडेश्वर यांचे भाषण झाले. यावेळी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस टी. बी. पाटील, महापालिका महिला व बाल कल्याण समिती सभापती रोहिणी काटे, परिवहन समिती सभापती वसंत कोगेकर, नगरसेवक राजू लाटकर, परीक्षित पन्हाळकर, आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)आपण नॉट रिचेबल नाहीआपण कधीही ‘नॉट रिचेबल’ राहिलो नसून जनतेच्या कामासाठी सदैव उपलब्ध आहे, असे सांगून त्यांनी प्रा. संजय मंडलिक यांचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला हाणला.
‘कोल्हापूर उत्तर’ वर राष्ट्रवादीचा दावा
By admin | Published: August 29, 2014 12:15 AM