एम. ए. शिंदे ल्ल हलकर्णीहलकर्णी जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गाचे असल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असून, अनेकांना आपल्या सौभाग्यवतींना रिंगणात उतरावे लागणार आहे. गेल्यावेळी हत्तरकी गट, राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना यामध्ये लढत झाली होती. राष्ट्रवादीने ही जागा जिंकली होती. यावेळी राष्ट्रवादी, हत्तरकी गट, शिवसेना, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशी पंचरंगी निवडणूक होण्याचे स्पष्ट संकेत आहेत. राष्ट्रवादी व हत्तरकी गट यांच्यातच खरा सामना होईल. मतांची विभागणी होणार असल्यामुळे एकगठ्ठा मतदान असणारा उमेदवार बाजी मारणार आहे. हलकर्णी जिल्हा परिषद गटात हलकर्णी व बसर्गे या पंचायत समिती गणांचा समावेश आहे.पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा दूध संघ अध्यक्ष, वीरशैव बँक अध्यक्ष या पदावर प्रभावी काम करून जनमनावर पकड निर्माण करणारे कै. राजकुमार हत्तरकी यांचा बालेकिल्ला म्हणून हा मतदारसंघ ओळखला जातो.आमदारकीची हॅट्ट्रिक साधणाऱ्या कै. बाबासाहेब कुपेकर यांनी विकासकामांच्या धडाक्यावर व कार्यकर्त्यांच्या बळावर २००२ मध्ये साताप्पा शेरवी यांना निवडून आणून हत्तरकी गटाला धक्का दिला होता. २००७ मध्ये राजकीय समीकरणे बदलली. हत्तरकी गट व राष्ट्रवादी एकत्र लढले. त्यावेळी हत्तरकी गटाच्या सुधाताई गवळी निवडून आल्या होत्या. हत्तरकी गटाने २०१२ च्या निवडणुकीत सर्व ताकदीनिशी सदानंद हत्तरकी यांना रिंगणात उतरविले होते. मात्र, तिरंगी लढतीचा लाभ राष्ट्रवादीच्या जयकुमार मुन्नोळी यांना झाला. त्यांनी जिल्हा परिषदेच्या विविध योजना आणि विकासकामे आणली. मात्र, यावेळच्या आरक्षणाने त्यांना थांबावे लागणार आहे.गडहिंग्लज कारखान्याच्या अटीतटीच्या लढतीत सदानंद हत्तरकी यांच्या विजयाने कार्यकर्त्यांत उत्साह निर्माण झाला आहे. त्यामुळे हा गटही ताकदीने रिंगणात उतरणार आहे. हलकर्णी पंचायत समिती गण अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. याठिकाणी सर्वच पक्षांना सक्षम उमेदवाराचा विचार करावा लागणार आहे, तर बसर्गे गण सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी असल्यामुळे येथे इच्छुकांची संख्या वाढणार आहे. हलकर्णी गणाचा उमेदवार जास्त मतदार असलेल्या तेरणीचा असणार आहे.बसर्गे गण यावेळी खुला आहे. याठिकाणी जनता दलाचे विद्यमान सदस्य बाळेश नाईक यांना पुन्हा संधी आहे. २०१२ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश थोरात यांचा त्यांनी पराभव केला होता. यावेळी त्यांना पुन्हा संधी आहे. हलकर्णी गणात हत्तरकी गटाच्या प्रियांका अरविंद व्हसकोटी व राष्ट्रवादीच्या अनुसया सुतार यांच्यात लढत झाली होती. त्यात विजयी झालेल्या सुतार यांना सभापतिपदाची संधी मिळाली. गतवेळी निवडणूक रिंगणातून बाहेर असलेले शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे तीनही जागा लढविणार आहेत. हलकर्णी गटात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर यांनी निवडणूक लढवून तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. यावेळी त्यांचा पक्षही तीनही जागा लढविणार आहे.
हलकर्णीत राष्ट्रवादी - हत्तरकी गटांतच लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2016 12:08 AM