कोल्हापूर : उत्तरदायित्व सभेच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार शक्तिप्रदर्शन करत जिल्ह्यातील दहा पैकी पाच जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मात्र, चार पक्षांच्या महायुतीत जागा वाटपाचे त्रांगडे असून, राष्ट्रवादीची ताकद ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’त असली तरी ‘राधानगरी’वरुन पेच निर्माण होणार आहे. त्यामुळे त्यांना ‘कागल’, ‘चंदगड’सह ‘शिरोळ’ची जागा मिळू शकते. जागा वाटपाचा तिढा गुंतागुंतीचा होणार असल्याने महायुतीतील बंडखोरांचे महाविकास आघाडीला बळ मिळणार आहे.लोकसभा निवडणुकीतील यशावरच विधानसभा निवडणुकीतील महायुतीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीनंतर महाविकास आघाडीची जिल्ह्यातील ताकद कमी झाली आहे. महायुतीची ताकद वाढली असली तरी त्याचा निवडणुकांमध्ये किती फायदा होतो, हे आगामी काळात पाहावे लागेल. लोकसभेला एकत्र राहायचे आणि महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत स्वबळ अजमावण्याची रणनीती महायुतीची आहे. त्यानंतर महायुतीची खरी परीक्षा विधानसभा निवडणुकीत पहावयास मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांची मागणी केली असली तरी त्यांना तीनच जागा मिळू शकतात.विधानसभेला कुस्ती होणार..भाजपने राज्यात लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. त्यांच्या दृष्टीने लोकसभा महत्त्वाची असून विधानसभेला जागा वाटपात फार ताणाताणी झाली तर मैत्रिपूर्ण लढत करण्याची तयारीही भाजपची असू शकते. त्यामुळे लोकसभेला दोस्ती आणि विधानसभेला महायुतीमध्ये कुस्ती होण्याची दाट शक्यता आहे.महायुतीमध्ये चार ठिकाणी बंडखोरी?महायुतीमध्ये ‘कागल’, ‘चंदगड’, ‘राधानगरी’ व ‘कोल्हापूर उत्तर’ येथे बंडखोरी होणार हे निश्चित आहे. कागलमधून समरजीत घाटगे, चंदगडमधून शिवाजी पाटील, राधानगरीतून ए. वाय. पाटील, तर कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांनी तयारी सुरू केल्याने पेच निर्माण होऊ शकतो.
तीन ठिकाणी आघाडीला उमेदवार शोधावे लागणारमहाविकास आघाडी सध्या ‘करवीर’, ‘कोल्हापूर दक्षीण’, ‘कोल्हापूर उत्तर’ व हातकणंगले’ मतदारसंघात भक्कम आहे. ‘राधानगरी’, ‘चंदगड’, ’शिरोळ’मध्येही त्यांची ताकद आहे; पण विजयापर्यंत पोहचू शकत नाही. ‘कागल’, ‘शाहूवाडी’, ‘इचलकरंजी’मध्ये आघाडीला उमेदवार शोधावे लागतील.
यड्रावकरांची राष्ट्रवादीशी जवळीकशिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे अपक्ष निवडून येऊन त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. सध्या ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. मात्र, जिल्ह्यात त्यांची सलगी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत आहे. राष्ट्रवादीच्या सर्व कार्यक्रमांना त्यांचे तालुक्यातील शिलेदार व शिरोळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील यांच्यासह दुसऱ्या फळीतील पदाधिकारी उपस्थित असतात. त्यामुळे महायुतीच्या जागा वाटपात शिरोळची जागा आपल्याकडे घेऊन तेथून राजेंद्र पाटील यांना रिंगणात उतरवण्याची रणनीती मंत्री मुश्रीफ यांची आहे.‘ए. वाय.’ यांच्यासमोर काँग्रेस, शिवसेनेचा पर्यायराष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आगामी २०२४ ची विधानसभा कोणत्याही परिस्थितीत लढण्याची तयारी सुरू केली आहे. माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्यापाहुण्यांमध्ये समझोता करून राधानगरी तून ‘ए. वाय.’ यांना चाल दिली जाईल, अशी ग्वाही मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्याची चर्चा मतदारसंघात आहे. मात्र, महायुतीच्या त्रांगड्यात येथे विद्यमान आमदार प्रकाश आबीटकर यांचा दावा राहतो. त्यामुळे ‘ए. वाय.’ यांच्यासमोर काँग्रेस किंवा शिवसेना (ठाकरे गट) हेच पर्याय राहू शकतात.
असे जागा वाटप होईल महायुतीत :
- भाजप : इचलकरंजी, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर
- जनसुराज्य पक्ष : शाहूवाडी, हातकणंगले
- शिवसेना (शिंदे गट) : करवीर, राधानगरी
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : कागल, चंदगड, शिरोळ