कोल्हापूर : ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शुक्रवारी रात्री कोल्हापूरमध्ये आगमन झाले. मात्र आष्ट्याहून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा मंत्री गडकरी यांच्या गाडीतून कोल्हापूरपर्यंतचा प्रवास अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. गडकरी आणि पवार यांचे आज शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहेत.रात्री साडे आठच्या सुमारास पवार यांचे कोल्हापुरात आगमन झाले. आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील, ए. वाय. पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, आदिल फरास, भय्या माने यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युवक आणि महिला कार्यकर्त्यांनी पवार यांचे स्वागत करण्यासाठी गर्दी केली होती. सुमारे वीस मिनिटे स्वागत, बुके, फोटो झाल्यानंतर मुश्रीफ यांनी सर्वांनाच बाजूला होण्यास सांगितले आणि पवार विश्रांतीसाठी आपल्या दालनाकडे रवाना झाले.साडे नऊच्या सुमारास नितीन गडकरी यांचे हॉटेलवर आगमन झाले. गडकरींचे भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत होण्याच्या धांदलीतच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गाडीतून एका बाजूने उतरले आणि अनेकांना धक्काच बसला. पाटील यांचे चिरंजीवही त्यांच्यासोबत होते. गडकरी यांच्या स्वागताच्या गडबडीत जयंत पाटील तेथून निघूनही गेले. मात्र साखर कारखान्याच्या इथेनॉलच्या प्रकल्पाच्या कामासंबंधात ते गडकरी यांच्याशी चर्चा करतच गाडीतून आल्याचे सांगण्यात आले.गडकरी यांचे स्वागत सुरू असतानाच खासदार धनंजय महाडिक यांचे हॉटेलवर आगमन झाले. त्यांनी पुष्पगुच्छ देऊन गडकरी यांचे स्वागत केले. यावेळी शनिवारच्या कार्यक्रमांच्या नियाेजनाबाबत चर्चा करून गडकरी विश्रांतीसाठी रवाना झाले. यावेळी संदीप देसाई, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, के. एस. चौगुले, दिग्विजय चौगुले, गायत्री राऊत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
महाडिक, विश्वजीत कदम, मानेंमध्ये हास्यविनोदमहाडिक हे स्वागत करून निघत असतानाच या ठिकाणी खासदार धैर्यशील माने आणि काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम हे दोघेही एकाच गाडीतून या ठिकाणी आले. यानंत पाच मिनिटे या तिघांच्यामध्येही हास्यविनोद आणि गप्पा रंगल्या. गडकरी येण्याआधीच वीस मिनिटे आमदार विनय कोरे हे या ठिकाणी आले होते. गडकरी यांना भेटण्यासाठी ते आधीच नियोजित ठिकाणी जाऊन बसले.