जहाँगीर शेखकागल : भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार आहेत. आनंदाची गोष्ट आहे. देवीमातेचे दर्शन घ्यावे, राजर्षी शाहुचे कोल्हापुर पहावे. माझ्या कामाबद्दलही माहिती घ्यावी. आमचा कोणीही कार्यकर्ता त्यांना रोखणार नाही असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले. ईडीच्या छापेमारीनंतर मुंबईहून ते कोल्हापुरात आले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. मुश्रीफांना भेटण्यासाठी समर्थकांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती.यावेळी बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले की, मी काय आहे हे जनतेला माहित आहे. गेली पाच वर्षे मला घेरण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काही हाती लागलेले नाही. ईडीचे अधिकारी बिचारे काय करणार? त्यांना कोणाचे तरी ऐकावे लागते. या मागे कोण आहे हे मी बोललो आहे. समरजित घाटगेंचा कार्यकर्ता दिपक मगर याला कसे चार दिवस आधी या कारवाईबद्दल कळाले? माझ्यावर प्रेम करणारी जनता व कार्यकर्ते दिवसभर उपाशी तापाशी थांबले. त्यांचे मी आभार व्यक्त करतो. असेही मुश्रीफ म्हणाले. बुधवारी (दि.११) सकाळच्या सुमारास मुश्रीफ यांच्या कागल येथील घरासह नातेवाईक, विश्वासू कार्यकर्ते आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर ईडीच्या पथकांनी छापे घातले. कोल्हापुरातील चार ठिकाणांसह पुण्यात तीन ठिकाणी दिवसभर कारवाई सुरू राहिली. सुमारे १२ ते १३ तास पथकाने सर्व कागदपत्रांची झाडाझडती घेतली. ईडीच्या या कारवाईवर संतप्त झालेल्या मुश्रीफ समर्थकांनी कोल्हापूरसह जिल्ह्यात विविध ठिकाणी निदर्शने करून राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध केला होता.
ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ कोल्हापुरात, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; सोमय्यांच्या दौऱ्याबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:21 AM