कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी (दि. २५) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार पहिल्यांदाच कोल्हापुरात येत असून, त्यांची दसरा चौकात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेबाबत जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. ते दोन दिवस कोल्हापुरात तळ ठोकून राहणार असून, दिग्गजांच्या गाठीभेटी व राजकीय खलबतेही होणार आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पक्षाध्यक्ष पवार यांची कोल्हापुरात सभा व्हावी, यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. त्यानुसार ही सभा होत असून, त्यासाठी ते कोल्हापुरात येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ते दहीवडी (जि. सातारा) येथून ते मोटारीतून कोल्हापुरात येणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ते दसरा चौकातील सभेच्या ठिकाणी जाणार आहेत. या दिवशी त्यांचा कोल्हापुरात मुक्काम असून, शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता ते शिष्टमंडळाला भेटणार आहेत.सकाळी ११ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, दुपारी १२ वाजता शाहू जन्मस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत. त्यानंतर ते राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या घरी जाणार आहेत. दुपारी अडीच वाजता महासैनिक दरबार हॉल येथील हिंद मजदूर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता ते मोटारीने पुण्याकडे रवाना होणार आहेत.रोहित पवार आजपासून कोल्हापूर दौऱ्यावरपक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे आज, बुधवारपासून कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी ११ वाजता गारगोटी, दुपारी २ वाजता गडहिंग्लज, सायंकाळी ६ वाजता इचलकरंजी येथे बैठक होणार आहे. उद्या, गुरुवारी सकाळी ९ वाजता अंबाबाई दर्शन घेतल्यानंतर साडेदहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, सकाळी ११ वाजता कोल्हापुरात बैठक घेणार असल्याची माहीती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राेहित पाटील यांनी दिली.
शरद पवारांची येत्या शुक्रवारी कोल्हापुरात सभा, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:43 PM