- वसंत भोसलेकोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकांद्वारे राज्याच्या राजकारणात आपले स्थान पुन्हा बळकट केले आहे. शरद पवार यांचे राजकारण संपणार, असे सांगणाऱ्यांना दणका दिला आहे. अनेकांनी पक्षाचा त्याग केला तरी नव्या पिढीच्या तरुण उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. शिवाय शरद पवार यांच्या झंझावाती प्रचाराची या यशापेक्षा अधिक प्रभावी चर्चा राज्यात सुरू झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला अनेकांनी सोडचिठ्ठी दिल्याने या पक्षाची विधानसभा निवडणुकीनंतर वाताहत होणार, असे बोलत जात होते.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर सातत्याने टीका करताना त्यांचे राजकारणच संपणार आहे, असे भाकीत केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस अनेकांनी सोडल्याने लढण्यासाठी पहिलवानच नाही, अशी टीका केली होती.शरद पवार यांनी याला आक्रमक उत्तर देत राज्यव्यापी दौरा सुरू केला, तर शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे आणि अमोल मेटकरी हे तरुणांना चेतवित राहिले. त्यांनी शिवशाहीच्या प्रचाराला शिवस्वराज्याच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न केला. शिवाय या सर्व प्रचाराचा सोशल मीडियावर प्रभावी प्रसारही राष्ट्रवादीने केला.महाराष्ट्रातील शेती अतिवृष्टी आणि दुष्काळ अशा दुहेरी संकटात सापडली आहे. कर्जमाफीच्या लाभापासून अनेक अटी-नियमांमुळे अनेक शेतकऱ्यांना वंचित ठेवले. त्यावर सरसकट कर्जमाफीचे आश्वासन शरद पवार यांनी दिले.
२००९ च्या कर्जमाफीची ते आठवण करून देत होते. दुसरा मुद्दा हा बेरोजगारीचा प्रश्न मांडत होते. त्याला तरुणांनी साथ दिली. या दोन्ही मुद्द्यांवरून बहुजन समाजावर अन्याय होतो आहे, हे अधोरेखित करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी झाली. काँग्रेससह अनेक समविचारी पक्षांशी युती करून राष्ट्रवादी काँग्रेसने १२४ जागा लढवित स्वपक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित केले होते. त्याचे नियोजन उत्तम केले होते. मुंबईसह कोकणात फारशा जागा लढवित नसल्याने पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खान्देशावरच त्यांनी प्रचाराचा भर ठेवला होता. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सोलापूर तसेच नगर या जिल्ह्यांत अधिक लक्ष दिल्याने त्याचे श्रेय या पक्षाला मिळाले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या धूर्तपणाच्या नेतृत्वामुळे पुणे जिल्ह्यात २१ पैकी दहा जागा जिंकल्या. मागील निवडणुकीत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसलाही दोन जागा मिळाल्या.
नाशिक आणि नगर जिल्ह्यांत भरघोस यश मिळाले. तुलनेने विदर्भात आणि मराठवाड्यात मर्यादित यश मिळाले. विदर्भात राष्ट्रवादीला कधीही साथ मिळाली नव्हती. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीनेही या निवडणुकीत राष्ट्रवादीची हवा तयार झाली. याचे श्रेय राष्ट्रवादीपेक्षा पराभूत भाजपचे उमेदवार उदयनराजे यांना द्यायला हवे. त्यांनी पवार यांना सोडणे, पश्चिम महाराष्ट्रात अजिबात आवडले नव्हते. त्यांना संधी देऊन मीच चूक केली, असे सांगून जनतेची पवार यांनी जाहीर माफी मागून ‘माझी चूक तुम्ही दुरुस्त करा’ असे भावनिक आवाहन केले. ते भर पावसातील भाषण सोशल मीडियावर राष्ट्रवादीने वादळासारखे फिरविले आणि शेवटच्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीची हवा तयार झाली.
पश्चिम महाराष्ट्राचा सर्वांत मोठा वाटा
राष्ट्रवादीच्या यशात नेहमीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा वाटा आहे. नगरसह या विभागात तब्बल २८ जागा जिंकल्या आहेत. शिवाय दोन अपक्षही या पक्षाचे आहेत. पुणे, नगर, सातारा या जिल्ह्यांचा मोठा वाटा होता. रोहित पवार, प्राजक्त तनपुरे, संदीप क्षीरसागर, आदिती तटकरे, राजेश पाटील आदी तरुणांनी राष्ट्रवादीला यश मिळविण्यास मदत केली.
प्रथम क्रमांकावर
राष्ट्रवादीची स्थापना १९९९ मध्ये झाली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रातून ३१ आमदार निवडून आले होते. मात्र काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळाल्या. २००४ मध्ये आघाडी करून लढताना एकच जादा जागा मिळाली. त्यानंतरच्या दोन निवडणुकीतही राष्ट्रवादी दुसºया क्रमांकावर आणि काँग्रेस पुढे होती. या निवडणुकीत काँग्रेसवर मात करीत ५४ जागा जिंकल्या.