कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची राज्यातील रणधुमाळी संपल्यावर लगेचच राष्ट्रवादीने विधानसभेसाठी जोर-बैठका सुरू केल्या आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन केले असून, तसे निरोप जिल्हा, तालुका पातळीवर पोहोचही झाले आहेत. येत्या उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईत पक्षाच्या कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत आजी-माजी आमदार, खासदार, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्याध्यक्ष, विविध सेलचे पदाधिकारी या सर्वांना बैठकीचे बोलावणे धाडण्यात आले आहे.विधानसभा निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने लोकसभा निवडणुकीतच विधानसभेच्या प्रचाराचे नारळ सर्वच पक्षांतील विद्यमान व इच्छुकांनी फोडले आहेत. स्वत: पवार यांनी तर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा संपल्यानंतर लागलीच पवार हे राज्यभर दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने फिरत आहेत.
या दौऱ्याच्या अनुषंगाने नापिकी, पाणीटंचाई, चार छावण्या हा विषय त्यांनी सातत्याने लावून धरला आहे. शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी आणि दुष्काळ हे तीन विषय आगामी विधानसभा निवडणुकीत तापण्याची चिन्हे असल्याने आतापासून वातावरण निर्मिती करण्याचे काम पवार यांनी हाती घेतले आहे.शनिवारी होणाऱ्या या आढावा बैठकीत लोकसभा निवडणुकीतील कामगिरीचा लेखाजोखा घेण्याबरोबरच भविष्यात विधानसभेला सामोरे जाताना पक्षाची कोणती दिशा असणार आहे, याचा आढावा घेतला जाणार आहे. लोकसभेला कोणी कोणाला मदत केली, याचा हिशेब मांडला जाणार आहे.
शिवाय प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळे पुढील काळात उमेदवारीचा घोळही निर्माण होणार आहे, याचा कानोसा या बैठकीच्या निमित्ताने घेतला जाणार आहे. या बैठकीच्या निमित्ताने एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकले जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.