विश्वास पाटील ।कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेला नवे चेहरे मैदानात उतरविण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात विद्यमान नेतृत्व सोडून पर्यायी सक्षम नेतृत्वच नसल्याने आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील हेच उमेदवारीचे दावेदार असतील, असेच चित्र आहे. राधानगरीमध्ये के. पी. पाटील की ए. वाय. पाटील; चंदगडमध्ये संध्यादेवी कुपेकर की नंदाताई बाभूळकर एवढा बदल होऊ शकतो. शिरोळ मतदारसंघ काँग्रेस आणि स्वाभिमानी संघटनेच्या आघाडीतून राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास तिथे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उमेदवार असू शकतात. त्या-त्या तालुक्यात हे नेते म्हणजेच पक्ष आहे. त्यांना वजा केल्यास पक्ष अस्तित्वहीन होतो, हे वास्तव आहे.जिल्ह्णात दहापैकी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आमदार आहेत. गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्यावर राधानगरी व शिरोळ मतदारसंघांत पक्षाचे उमेदवार दुसºया क्रमांकावर होते. त्यामुळे या चार मतदारसंघांत पक्षाला आगामी निवडणुकीतही चांगली संधी आहे.
राष्ट्रवादी पक्ष अजूनही कोल्हापूर उत्तर किंवा शाहूवाडी मतदारसंघासाठी आग्रह धरू शकतो. शाहूवाडीतून मानसिंगराव गायकवाड हे संभाव्य उमेदवार असू शकतील; परंतु कोल्हापूर उत्तरमध्ये लढण्यासाठी त्यांच्याकडे आज उमेदवारच नाही. मधुरिमाराजे यांच्या नावाची अधूनमधून चर्चा होते; परंतु त्यांना छत्रपती घराण्यातूनच अजून परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे त्या नसतील तर राष्ट्रवादीकडे लढायला उमेदवार नाही.
कागलमध्ये आमदार मुश्रीफ यांच्याइतका प्रभावशाली नेता त्या पक्षाकडे नाही. जिल्हा बँकेचे संचालक भैया माने हे कागलच्या राष्ट्रवादीचे सेनापती असले तरी ते मुश्रीफ यांचे पर्याय होऊ शकत नाहीत. मुश्रीफ यांचा मुलगा नविद हा संताजी घोरपडे कारखान्याचा अध्यक्ष व मुश्रीफ फौंडेशनच्या माध्यमातून सक्रिय असला तरी त्याचीही उंची आमदार मुश्रीफ यांच्याइतकी नाही. शिवाय मुश्रीफ हे विद्यमान आमदार आहेत. अल्पसंख्याक समाजातील म्हणून पक्षाचे ते राज्यस्तरीय नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी बदलण्याचा प्रश्नच येणार नाही.
राधानगरी मतदारसंघात माजी आमदार के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यात उमेदवारीची रस्सीखेच असली तरी पक्ष के. पी. पाटील यांनाच संधी देण्याची शक्यता जास्त आहे. के. पी. व ए. वाय. या मेहुण्यापाहुण्यांना प्रत्येकी दोन मुले आहेत; परंतु त्यांचीही विधानसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघात प्रतिमा उभी राहिलेली नाही. त्यामुळे तिथेही प्रस्थापित नेतृत्वावरच पक्ष अवलंबून आहे. चंदगडमध्ये आमदार संध्यादेवी कुपेकर यांना दोन वेळा संधी मिळाली. तिथे त्यांची मुलगी नंदाताई यांना ‘राष्ट्रवादी’कडून उमेदवारी दिली जाऊ शकते. यापुढील आमदार नंदाताईच असतील, असेही मुश्रीफ यांनीही एकदा जाहीर केले आहे. या मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना दुसºया क्रमांकाचे मताधिक्य मिळाले असल्याने राष्ट्रवादी तिथे आईऐवजी मुलगीस मैदानात उतरवू शकते. डॉ. नंदाताई या डॅशिंग आहेत. उच्चशिक्षित आहेत. त्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. शिरोळ मतदारसंघातून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तिथे काँग्रेस-राष्ट्रवादी व स्वाभिमानी संघटनेकडेही ताकदीचे उमेदवार आहेत. आघाडीमध्ये ही जागा कुणाच्या वाट्याला जाते व इतर दोघे काय भूमिका घेतात, एवढीच या मतदारसंघातील उत्सुकता आहे. अन्यथा राष्ट्रवादीकडून यड्रावकर यांची उमेदवारी नक्की आहे.महाडिक यांचे तोंडावर बोटमुंबईत शनिवारी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. त्यामध्ये लोकसभेचा पराभव मागे टाकून नव्या दमाने विधानसभेला सामोरे जाण्याचा निर्णय झाला. या बैठकीसाठी आमदार मुश्रीफ, आमदार कुपेकर, के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, राजेंद्र पाटील-यड्रावकर, आदी प्रमुख नेते उपस्थित होते. कार्यकारिणीच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांनी कारणमीमांसा केली; परंतु कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार धनंजय महाडिक व मावळमधील पार्थ पवार यांनी मात्र तिथे काहीच भूमिका मांडली नाही.