लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पुण्यातील दूध वितरण व पॅकेजचा गायत्री कोल्ड स्टोअरेजचा ठेका रद्द करण्याचा निर्णय ‘गोकुळ’च्या संचालकांनी घेतला; मात्र याबाबत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने नाराजी व्यक्त करत ठेका पूर्वरत करण्याचे आदेश दिला आहे. टेंडरचा दर कमी भरल्याने पशुखाद्य वाहतुकीचे ठेके संघाचे माजी संचालकांच्या संस्थेलाच द्यावा लागल्याने संचालकांची काेंडी झाली आहे.
‘गोकुळ’मध्ये सत्तांतर झाल्यानंतर पूर्वीच्या ठेक्यासह अनेक गोष्टी बदलण्याचा धडाका लावला आहे. पुण्यातील दूध वितरण व पॅकिंगचा ठेका गेली २६ वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे जावई विजय ढेरे यांच्या मालकीच्या ‘गायत्री कोल्ड स्टोरेज’कडे आहे. तो करार रद्द करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला. मात्र, या निर्णयाच्या आड पुणे जिल्ह्यातील राजकारण आल्याने त्याचे पडसाद राष्ट्रवादीअंतर्गत उमटले आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने हा ठेका रद्द करू नये, असे फर्मान ‘गोकुळ’च्या नेत्यांसह संचालकांना काढल्याचे समजते.
त्याचबरोबर दूध संस्थांना पशुखाद्य पाेहच करण्यासाठी वाहतूक संस्थांकडून टेंडर मागवले होते. मागील पाच वर्षांत दोन संचालकांसह एका नेत्याच्या समर्थकाच्या संस्थांना वाहतूक ठेका देण्यात आला होता. सत्तांतरानंतर एका माजी संचालकाने व नेत्याच्या समर्थकाने कमी दराने टेंडर भरल्याने त्यांनाच ठेका द्यावा लागणार आहे.
शॉपी वाटपातही हाती धुपाटणे
‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर व ताराबाई पार्क येथील शॉपीचे ठेके बदलण्यात आले आहेत. त्यातील एक ठेका विद्यमान संचालकाच्या जवळच्या कार्यकर्त्यांकडे होता. तरीही तो बंद करून दुसऱ्याच व्यक्तीला देण्याचा निर्णय झाल्याने हाती धुपाटणे आल्याची चर्चा सध्या संघात सुरू आहे.