कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा ताकदीने, स्वबळावर लढण्याचे आदेश करवीर व हातकणंगले तालुक्यातील कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रविवारी दिले. सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करायचे आणि समविचारी पक्षाशी आघाडीबाबत चर्चा करण्याची तयारी पक्षाने केली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी करण्यास कॉँग्रेस अनुकूल नसल्याने राष्ट्रवादीपुढे पेच निर्माण झाला आहे. हातकणंगले व करवीर तालुक्यांत सर्वाधिक २२ जिल्हा परिषदेच्या जागा आहेत. येथे राष्ट्रवादी कमकुवत असल्याने येथे कॉँग्रेससोबत आघाडी करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा प्रयत्न आहे; पण कॉँग्रेसचे नेते आघाडीबाबत फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. याद्या जाहीर करण्याची वेळ आली तरी आघाडीचा गुंता सुटत नसल्याने रविवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात करवीर व हातकणंगले तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. यामध्ये मतदारसंघनिहाय आढावा घेऊन जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या. करवीरमध्ये अद्याप कोणाशी आघाडी झाली नसली तरी हातकणंगलेत माने गटाने भाजप-ताराराणी-जनसुराज्य पक्षाशी आघाडी केली आहे. या आघाडीत पट्टणकोडोली व रुकडी हे मतदारसंघ माने गटाच्या वाटणीला येण्याची शक्यता आहे. उर्वरित नऊ मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढविण्याची तयारीही पक्षाने केली आहे. तीच रणनीती गडहिंग्लज, चंदगड व आजरा तालुक्यांतही राहू शकते. बैठकीला जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, अनिल साळोखे, मधुकर जांभळे, हंबीरराव पाटील, बाबूराव हजारे, आप्पासाहेब धनवडे, शिवाजी देसाई, हातकणंगले तालुकाध्यक्ष पिष्ठे, उपस्थित होते. नरकेंच्या झटक्याने राष्ट्रवादी हडबडली!जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच करवीरमध्ये राष्ट्रवादी-शेकाप-शिवसेना अशी आघाडी ठरली होती. त्यानुसार परिते मतदारसंघ राष्ट्रवादीला देण्याचा गुप्त समझोता झालाही होता; पण उघड आघाडी करणे आमदार चंद्रदीप नरके यांना अडचणीचे ठरणार असल्याने राष्ट्रवादीची गोची झाली आहे. ‘शेकाप’ हा नैसर्गिक मित्र असल्याने त्याच्याशी चर्चा होऊ शकते.
राष्ट्रवादीची स्वबळाची तयारी
By admin | Published: January 30, 2017 1:00 AM