कोल्हापूर : राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार एक वर्षाचा कालावधी पूर्ण करत आहे. वर्षभरात सरकारच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राज्यात २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत ‘थाळी नाद’ आंदोलन हाती घेतले आहे. तहसीलदार कार्यालयावर मोर्चाद्वारे हल्लाबोल केला जाणार आहे. केंद्रातील भाजपचे सरकार सत्तेवर येऊन दीड वर्षे पूर्ण झाले आहे. राज्यातील युती सरकारला ३१ आॅक्टोबरला वर्ष होत आहे. भाजप सरकारच्या या कालावधी राज्यात भयावह दुष्काळ पडला. या दुष्काळातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी युती सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. उलट चुकीची धोरणे राबवून सामान्य माणसांना वेठीस धरण्याचे काम सरकारने सुरू केले आहे. सरकार संवेदनहीन बनले आहे. याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे २५ ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत तहसीलदार कार्यालयावर ‘हल्ला बोल’ आंदोलन केले जाणार आहे. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या सरकारचा खरा चेहरा सामान्य माणसांसमोर आल्याने ‘अच्छे दिन’चा बुरखा फाटला आहे. ‘थाळी नाद’ च्या माध्यमातून जनतेच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचविणार आहे. - अनिल साळोखे (सरचिटणीस, राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी,कोल्हापूर)
सरकारविरोधात राष्ट्रवादीचे ‘थाळी नाद’
By admin | Published: October 20, 2015 11:42 PM