कोल्हापूर : राज्य सरकारने साखर कारखान्यांना जाहीर केलेले दोन हजार कोटींचे पॅकेज त्वरित द्यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शनिवारी कोल्हापुरात मोर्चा काढला. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरावर मोर्चाचे नियोजन केले होते; पण पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने ‘यू’ टर्न घेत मोर्चा हॉकी स्टेडियमकडे वळविण्यात आला. तेथे मंत्री पाटील व आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाली. दोन हजार कोटींचे पॅकेज विनाअट सरकारने द्यावे, अशी मागणी करीत राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी सरकारला ३१ मेची डेडलाईन देत पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तरीही पॅकेज दिले नसल्याने शनिवारी निर्माण चौक, संभाजीनगरपासून पालकमंत्री पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले होते. या मोर्चाला भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रतिमोर्चाचे आव्हान दिल्याने जिल्ह्णातील वातावरण चांगले तापले होते. शनिवारी सकाळी दहापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मैलखड्डा येथील मैदानावर एकत्रित येत होते. दुपारी साडेबारा वाजता मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका करताना आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, शेतकऱ्यांचे हजार कोटी रुपयांची ऊस बिले अडकली आहेत. जूनअखेर कर्ज परत केले, तर नवीन कर्ज मिळणार आहे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला असताना केवळ आश्वासनापलीकडे सरकार काहीच करत नाही. धनगर समाजाचे आरक्षण, एलबीटी, टोल यांसह प्रत्येक गोष्टीत सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काळ््या पैशांतून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये देण्याची घोषणाही मोदी सरकारने केली होती. फसवणूक करून सत्तेवर आलेल्या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे. पॅकेजबाबत केवळ निवेदन देऊन चालणार नाही. ठोस आश्वासन घेतल्याशिवाय कोल्हापूर सोडायचे नाही. प्रसंगी शहरातील वाहतूक ठप्प करावी लागली तरी बेहत्तर, शेतकऱ्यांसाठी गोळ्या छातीवर घेण्याची तयारी करूनच आम्ही येथे आल्याचा इशाराही त्यांनी दिला. खासदार धनंजय महाडिक, के. पी. पाटील, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, भैया माने, धैर्यशील पाटील, व्यंकाप्पा भोसले, प्रा. किशन चौगले यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार संध्यादेवी कुपेकर, निवेदिता माने, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आर. के. पोवार, ‘गोकुळ’चे संचालक विलास कांबळे, प्रवीणसिंह पाटील, नामदेवराव भोईटे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, मधुकर जांभळे, आदील फरास, आदी उपस्थित होते. त्यानंतर दुपारी सव्वा दोन वाजता मेळाव्याच्या ठिकाणाहून मोर्चा निघाला. निर्माण चौकातच पोलिसांनी मोर्चा अडवून हॉकी स्टेडियमकडे वळविला. चौकात मोर्चा थांबवून आमदार मुश्रीफ, खासदार महाडिक, निवेदिता माने, आमदार कुपेकर, ए. वाय. पाटील, के. पी. पाटील आदींचे शिष्टमंडळ स्टेडियमच्या कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीला गेले. राष्ट्रवादी ‘नंबर वन’च! घरावर मोर्चा काढणार म्हटल्यावर काहीतरी कारण सांगून दादा पळ काढत आहेत. त्यांच्या घरासमोर दोनशे कार्यकर्ते असल्याचे कळले. आमचे वीस हजार आहेत. राष्ट्रवादीची ताकद कोणी अजमावण्याचा प्रयत्न करू नये. अजूनही राष्ट्रवादी जिल्ह्यात ‘नंबर वन’च असल्याचा टोला मुश्रीफ यांनी हाणला. म्हणूनच मोर्चा शिवाजी महाराज स्वारीवर जाताना पिकांच्या देठालाही कोणाला हात लावू देत नव्हते. आता शेतकरी हवालदिल झाला आहे, या दिवसाची आठवण राज्यकर्त्यांना व्हावी, यासाठीच शिवराज्याभिषेकादिवशी मोर्चा काढल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. साखरेचं पोतं सुईनं उसवलं... साखर कारखान्यांना राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, तेही बिनव्याजी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. गतवर्षी केंद्रात भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले; पण त्यांनी राज्य सरकारला या पॅकेजबद्दल मदतीचा हात दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी ‘साखरेचं पोतं सुईनं उसवलं आणि मोदी सरकारनं शेतकऱ्यांना फसवलं,’ असे सरकारचे वर्णन केले.(प्रतिनिधी)
पॅकेजसाठी राष्ट्रवादीचा विराट मोर्चा
By admin | Published: June 07, 2015 1:26 AM