लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीची तारीख आज, सोमवारी निश्चित होणार असून साधारणता ८ किंवा ९ जुलै रोजी निवडी हाेण्याची शक्यता आहे. अध्यक्ष पदी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असून उपाध्यक्षपदी अपक्ष रसिका अमर पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेवर आल्यानंतर जिल्हा परिषदेमध्येही सत्तांतर घडले. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्र पक्षांनी मिळून भाजपची सत्ता संपुष्टात आणली. दीड वर्षानंतर पदाधिकारी बदलाचा निर्णय झाला आणि त्यानुसार सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती पदासाठी इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. अध्यक्ष पद कॉंग्रेसकडेच राहील असे त्यांचे सदस्य सांगत असले तरी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होईल, असे स्पष्ट करून संमभ्रवस्था दूर केली. राष्ट्रवादीकडून अध्यक्ष पदासाठी युवराज पाटील, जयवंतराव शिंपी व विजय बोरगे हे इच्छुक असले तरी मंत्री मुश्रीफ सांगतील तेच नाव निश्चित होणार आहे. पडद्यामागील हालचाली पाहता युवराज पाटील यांचे पारडे जड असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
अध्यक्षपद कॉंग्रेसला मिळाले तर राहुल पाटील, सरिता खोत, पांडूरंग भांदिगरे आदी इच्छुक होते. मात्र उपाध्यक्ष पदासाठी पालकमंत्री सतेज पाटील ठरवतील त्याच नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र विधानपरिषदेच्या तोंडावर पालकमंत्री सतेज पाटील यांची या निवडीमध्ये सावध भूमिका राहणार आहे. उपाध्यक्षपदी करवीर तालुक्यातील शिंगणापूर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या रसिका पाटील यांचे नाव आघाडीवर आहे.
चारपैकी तीन विषय समिती सभापतिपदे ही शिवसेनेच्या शिवानी भोसले, वंदना जाधव व कोमल मिसाळ यांची नावे निश्चित आहेत. चंदगड विकास आघाडीचे कल्लाप्पा भोगण व विद्या विलास पाटील यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यापैकी भोगण यांना चौथे सभापतिपद मिळू शकते. त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे बांधकाम किंवा शिक्षण यापैकी एकाची मागणी केली आहे.