कोल्हापूर : माझा आधार आणि मला पोटच्या मुलासारखे सांभाळणारे बाबा हरपल्याचे सांगत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचा चालक २८ वर्षीय नरेश नाकती सोमवारी भावुक झाला. ‘अरे नरेश’ अशी बाबांची हाक आता ऐकू येणार नसल्याचे सांगताना त्याचा कंठ दाटून आला.
मी मूळचा रायगड येथील आहे. बाबा (प्रा. पाटील) मुंबईत असताना त्यांच्या घरी माझे वडील नथुराम नाकती काम करत होते. माझे शिक्षण पाचवीपर्यंत झाले होते. त्यावर वडिलांनी मला काम देण्याबाबत बाबांकडे विनंती केली. त्यावर गेल्या आठ वर्षांपूर्वी बाबांनी त्यांच्याकडे चालक म्हणून मला नोकरी दिली. त्यांच्या घरीच राहत होतो. अगदी पोटच्या मुलासारखे त्यांनी मला सांभाळले. काही कमी केले नाही. ‘अरे नरेश’ अशी बाबा नेहमी हाक मारायचे. कोणी मला जरा वेगळ्या पद्धतीने हाक मारली, तर बाबा त्यांना रागवत होते. गेल्या चार वर्षांपासून मी चालक म्हणून त्यांच्याबरोबर जात नव्हतो. घरी थांबून आई-बाबांची सेवा करत होतो. माझ्या आयुष्याला वेगळे वळण त्यांनी दिले. बाबांच्या निधनाने माझा आधार हरपला असल्याचे सांगताना नरेश याला अश्रू अनावर झाले.