शिरोळ / बुबनाळ / कुरुंदवाड : पावसाची संततधार सुरू असल्याने कृष्णसेह, पंचगंगा, दुधगंगा व वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर नृसिंहवाडी-औरवाड जुना पूल व शिरढोण-कुरुंदवाड पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पावसाचे पाणी शेतात साचल्यामुळे पिकांना धोका निर्माण झाला आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पूर परिस्थितीमध्ये मदत कार्यासाठी गुरुवारी शिरोळ येथे एनडीआरएफचे एक पथक दाखल झाले आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था दत्त कारखाना कार्यस्थळावरील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये करण्यात आली आहे. अत्याधुनिक साधनांसह २२ जवानांचे हे पथक आले आहे.
गेल्या चार दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच असल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शिरढोण-कुरुंदवाड दरम्यान पंचगंगा पुलावर गुरुवारी सायंकाळी पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त झाल्याने खळखळून वाहणारी नदी आणि पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी केली होती. तसेच शिरढोण-नांदणी मार्गावर नांदणी ओढ्यातील रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नृसिंहवाडी-जुना औरवाड पूलही पाण्याखाली गेला आहे.
फोटो - २२०७२०२१-जेएवाय-१०, ११, १२, १३
फोटो ओळ - १०) शिरोळ येथील दत्त कारखान्यावर एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. ११) कुरूंदवाड-शिरढोण पंचगंगा पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक सायंकाळी बंद करण्यात आली. १२) नृसिंहवाडी-जुना औरवाड पूल पाण्याखाली गेला आहे. (छाया-रमेश सुतार बुबनाळ) १३) शिरोळ-शिरटी मार्गावरील सोयाबीन पिकात अशाप्रकारे पावसाचे पाणी साचल्याने पिकाला धोका निर्माण झाला आहे. (छाया-सुभाष गुरव, शिरोळ)