इंदुमती गणेश ।कोल्हापूर : येथील अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या मुलाखतीत १२० पैकी दोघेच कसेबसे काठावर पास झाले; त्यामुळे समिती या सगळ्यांनाच आता देवीच्या पूजेचे प्रशिक्षण देणार आहे.
या विषयांवर समितीच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर ही बाब न्याय व विधी खात्याला कळविण्यात आली. त्यावर खात्याचे मुख्य सचिवांनी सर्व उमेदवारांना देवीच्या पूजेचे प्रशिक्षण द्या आणि त्यातून योग्य उमेदवार निवडा असा पर्याय सुचविला आहे; त्यामुळे नवरात्रौत्सवानंतर देवस्थान समितीच्यावतीने या सर्व उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी कायद्याची अंमलबजावणी करायची असेल, तर नवे पुजारी नेमले पाहिजेत; त्यासाठी दोन महिन्यांपूर्वी समितीच्यावतीने शिवाजी विद्यापीठात दोन दिवस उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात कोल्हापूरसह अन्य शहरांतील १२० उमेदवार सहभागी झाले होते. या सगळ्या उमेदवारांना निवड समितीने देवीचा इतिहास, पूजाविधी, मंत्रोच्चाराविषयीचे प्रश्न विचारले होते. उमेदवारांना उत्सवमूर्तीला साडी परिधान करून दाखवायचे होते; पण एक-दोघे वगळता अन्य कोणताही उमेदवार नियुक्तीस पात्र ठरला नाही. पास झालेला एक उमेदवार पढवून आणल्यासारखा तयार होता, तर दुसरा काठावर पास. त्यातही उमेदवारांना दिलेल्या गुणांत फेरफार झाल्याचेही निवड समितीतल्या काहीजणांची तक्रार आहे.
अंबाबाई मूर्तीला घागरा चोली परिधान केल्यानंतर कोल्हापुरात उसळलेल्या जनआंदोलनाचे फलित म्हणून उन्हाळी अधिवेशनात पगारी पुजारी कायदा संमत झाला; मात्र देवस्थान समितीची त्यादृष्टीने तयारीच झालेली नसल्याचे कारण सांगत राज्य शासनाने अधिसूचना काढलेली नाही. अंबाबाई मंदिरातील सध्याचे पुजारी हे एका मुनीश्वर घराण्यातील असून, देवीच्या पूजेचे वार ५० कुटुंबांमध्ये वाटले गेले आहेत. त्यांना हटवून नवे पुजारी नेमायचे असतील, तर त्यांना पूजेचे ज्ञान असणे आवश्यक आहे; त्यामुळे देवस्थान समितीने आम्ही अद्याप कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने तयार नाही, असे शासनाला सांगितले होते.प्रशिक्षणासाठी २५ लाखांची तरतूदया प्रशिक्षणासाठी देवस्थान समितीने २५ लाखांची तरतूद केली आहे; मात्र त्याला दोन सदस्यांनी विरोध केला आहे.स्थानिक उमेदवार असतील, तर राहण्याचा आणि रात्रीच्या जेवणाचा प्रश्न येणार नाही.बाहेरगावच्या उमेदवारांचीच सोय बघावी लागणार आहे; त्यासाठी एवढ्या रकमेचा अनावश्यक खर्च कशाला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.मर्जीतले उमेदवार यादीतदेवस्थान समितीने निवडलेल्या यादीतील बहुतांशी पुजारी जोतिबाचे आहेत. या पुजाऱ्यांना तेथील पूजेचा व उत्पन्नाचा अधिकार असताना त्यांनाच अंबाबाई मंदिरासाठीदेखील का नेमावे हा मुद्दा वादग्रस्त ठरू शकतो. समितीतील पदाधिकारी व अधिकाºयांनी मर्जीतल्या अनेक पुजाºयांची नावे यादीत दिली आहेत. त्यात बहुतांशी नावे या पुजाºयांची असून, त्याला सदस्यांचा विरोध आहे.