कोल्हापूर : कोल्हापूरजवळील कळे (ता. पन्हाळा) येथील बँकेवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून बँक फोडल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी सव्वाकोटीची रक्कम लंपास केली आहे. पोलिसांना ही घटना कळताच त्यांनी तत्काळ कळे येथे घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली आहे.
कुडित्रे येथील यशवंत बँकेच्या कळे शाखेत चोरट्यांनी रात्री धाडसी दरोडा टाकला. चोरट्यांनी कटरचा उपयोग करुन सर्वप्रथम बँकेची खिडकी कापून आत प्रवेश केला. आत प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडले. त्यानंतर बँकेचे लॉकर फोडून आतील रक्कम लंपास केली.
या लॉकरमधील अंदाजे ८ लाख ५७ हजार रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली असली तरी नेमकी किती रक्कम आहे, हे अद्याप समजलेले नाही. तारण ठेवलेले सोन्याचीही चोरट्यांनी चोरी केली असून त्याचे मोजमाप सुरु आहे.
दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथकासह धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा सुरू केला असून अजून किती रक्कम चोरीस गेली याचा अंदाज आलेला नाही. पोलिसांचा श्वानपथकामार्फत कसून शोधमोहीम सुरू आहे.