कोल्हापूर : पदनामामध्ये बदल करून वेतनश्रेणी घेणारे सुमारे ३०० कर्मचारी शिवाजी विद्यापीठात आहेत. संबंधित वेतनश्रेणीची रक्कम वसुली करण्याचा आदेश शासनाने विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे.राज्यातील सहा विद्यापीठांमध्ये झालेल्या पदनाम गैरव्यवहार प्रकरणाची राज्य शासनाने चौकशी पूर्ण करून बेकायदेशीरपणे बदललेली सर्व पदनामे रद्दबातल ठरली आहेत.
पदनाम बदलून घेतलेल्या संपूर्ण वाढीव पगाराची वसुली करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठातील सुमारे ३०० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सहायक, आदींचा समावेश आहे.
पदनामात बदल केलेल्या या कर्मचाऱ्यांना शासनाकडून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून वाढीव पगार, भत्ते देण्यात आले आहेत. सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतनही देण्यात आले आहे. पदनामामध्ये बदल झालेल्यांपैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत.
शासनाच्या संबंधित आदेशामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यांतील काहीजण घाबरले आहेत. दरम्यान, विद्यापीठ सेवक संघाची बुधवारी दुपारी बैठक झाली. त्यामध्ये या आदेशाच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. याबाबत सेवक संघाची भूमिका जाणून घेण्यासाठी संघाचे अध्यक्ष बाबा सावंत यांना दूरध्वनी केला असता त्यांनी तो उचलला नाही.