आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : सध्याच्या बदलत्या पर्जन्यमानानुसार शेतकरी, कृषी विद्यापीठे आणि शासन यांनी एकत्र येवून पाणी आणि शेतीच्या नवीन योजना तयार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन भारतीय जलसंस्कृती मुख्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी बुधवारी येथे केले.
शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात विश्व जल दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्र जलदूत संमेलनामध्ये ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभाग, भारतीय जलसंस्कृती मंडळ, इन्स्टिट्यूशन आॅफ इंजिनिअर्सतर्फे हे संमेलन घेण्यात आले. अध्यक्षस्थानी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी होते.
डॉ. देशकर म्हणाले, बदलत्या हवामानामुळे पर्जन्यमान अनिश्चित झाले आहे. त्याचा परिणाम अन्नधान्य आणि जीवनमानावर होत आहे. ते लक्षात घेवून प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा. दरम्यान, डॉ. देशकर यांनी मार्गदर्शन करताना विश्व जल दिनाची सुरूवात कशी झाली, ती का करावी लागली, या मागणी शंभर वर्षातील पर्जन्यमान आणि त्यातील मूलभूत बदलांबाबतची माहिती दिली.
भूजल तज्ज्ञ शशांक देशपांडे यांनी महाराष्ट्रातील भूजल वापर व कायद्याची गरज याविषयावर मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्राची पाण्याची स्थिती व त्याचा वापर, नियम याची माहिती दिली.
संमेलनातील दुपारच्या सत्रात पुण्यातील सागरमित्र अभियानचे संचालक विनोद बोधनकर म्हणाले, पाणी वापराबाबत समाजात जागृती व्हावी. त्यासाठीच्या चळवळीत युवकांनी सहभागी व्हावे आवाहन केले.
भारतीय जलसंस्कृती मंडळाचे कोल्हापूर अध्यक्ष प्रा. डॉ. अनिलराज जगदाळे यांनी पाणी साठवणूक, भूजल पुनर्रभरण, जलप्रदूषण नियंत्रण, स्वच्छता अभियान, चांगल्या आरोग्यसेवा, निर्मलग्राम योजना, ऊर्जा निर्मिती, विकास व नवीन तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. बागी यांनी जलसंवर्धनाबाबत प्रबोधनासाठी महाविद्यालय, शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. संमेलनात मंगेश जाधव, निशांत पुजारी या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रा. महेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. रविना पुजारी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अमोल कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय
पाणी वापराबाबत प्रबोधन करण्याच्या उद्देशाने येत्या चार महिन्यांत कोल्हापूरमध्ये जलस्थापत्य परिषद घेण्याचा निर्णय या संमेलनात घेण्यात आला. यात प्राचीन काळापासून आतापर्यंतचे जलसंवर्धनाचे प्रयोग, उपायांचा आढावा, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, आदी आयोजित करण्यात येतील. त्याची तयारी सुरू झाली असल्याचे प्रा. अमोल कुलकर्णी यांनी सांगितले.