गडहिंग्लज : आपल्याला काय बनायचं आहे, ते आधी ठरवा. त्या अतूट ध्येयाप्रती निष्ठा ठेवा. समर्पणाच्या भावनेतून जिद्दीने प्रयत्न करा, यश तुमचेच आहे, असा सल्ला भुदरगडचे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी स्पर्धा परीक्षार्थींना दिला.
येथील ज्ञानदीप प्रबोधिनी संचलित झेप अकॅडमीतर्फे आयोजित सत्कार व स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी 'रवळनाथ' व ज्ञानदीप प्रबोधिनीचे संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले होते. जिल्हा परिषदेकडून उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. खिलारी व अहिर यांचा चौगुले यांच्या हस्ते, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार झाला.
खिलारी म्हणाले, स्पर्धेचा बाजार हे मोठे मायाजाळ आहे. त्यामुळे समूहशक्तीला पर्याय नाही. समूहवाचन, समूहचर्चा, इच्छाशक्ती व आत्मविश्वास यांच्या जोरावरच त्यात यश मिळविता येईल.
अहिर म्हणाले, स्पर्धा परीक्षांच्या विश्वात अनेक संधी आहेत. त्यांचा शोध घ्या. स्वत:ला कमी लेखू नका. आत्मबळाच्या ताकदीवरच यश मिळेल.
चौगुले म्हणाले, खिलार व अहिर यांची कर्तव्यनिष्ठा आणि सामान्य माणसाविषयीचा कळवळा तरुणाईला प्रेरणादायी आहे. कार्यक्रमास दत्तात्रय मायदेव, आर. एस. निळपणकर, विजय आरबोळे, संजय चौगुले, निजगुणी स्वामी, भैरू वालीकर, पुष्पलता मडलगी, सागर माने, गौरी बेळगुद्री, सीमा साठे, श्वेता टोणाण्णवर, प्राचार्य मीना रिंगणे यांनी प्रास्ताविक केले. रेखा पोतदार यांनी सूत्रसंचालन केले. नीतेश रायकर यांनी आभार मानले.
समाजाला विसरू नका. कितीही मोठे झालात तरी आई-वडिलांच्या कष्टाची आणि ज्या समाजाने आपल्याला घडविले त्या समाजाचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन खिलारी यांनी केले.
-------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथील झेप अकॅडमीच्या प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रांताधिकारी संपत खिलारी. शेजारी एम. एल. चौगुले, महेश मजती, मीना रिंगणे, आदी उपस्थित होते.
क्रमांक : ११०२२०२१-गड-०५