कोल्हापूर : कोणतीही समस्या चांगल्या पद्धतीने सोडविण्याची अंगभूत क्षमताच महिलांना चांगली उद्योजिका बनवू शकते. उद्यमशीलता व त्यासोबत येणारे आर्थिक स्वावलंबन हीच महिला सक्षमीकरणाची पहिली पायरी आहे, असे प्रतिपादन कृषी विभागाच्या विभागीय उपसंचालक भाग्यश्री पवार-फरांदे यांनी मंगळवारी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयात आयोजित ‘फळे व भाजीपाला प्रक्रिया तंत्रज्ञानातील नवीन संधी’ या दोनदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख इंजि. ए. पी. पाटील यांनी फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक उपकरणे व यंत्रे, त्यांची उपलब्धता याविषयी माहिती दिली. याशिवाय विविध फळांपासून जेली व टुटीफ्रुटी बनविण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयाच्या उद्यानविद्या विभागाचे डॉ. संग्राम धुमाळ यांनी दिले. फळांपासून जॅम निर्मिती तंत्रज्ञान याविषयी डॉ. सीमा सरवदे यांनी प्रशिक्षण दिले. कृत्रिम शीतपेये शरीरास हानिकारक असून फळांपासून आरोग्यानुकूल विविध शीतपेये, स्क्वॅश व रेडी टू सर्व्ह पेय यांची निर्मिती यावर डॉ. यू. एस. शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी महाविद्यालयांच्या उद्यानविद्या विभागामार्फत निर्मित प्रक्रिया केंद्राचा व प्रयोगशाळेचा आढावा घेतला. कार्यक्रमाचा समारोप कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना बक्षीस व प्रमाणपत्र वाटपाने झाला.
फोटो: ०९०३२०२१-कोल-कृषी
फोटो ओळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कोल्हापुरातील कृषी महाविद्यालयात आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात भाग्यश्री पवार यांनी मार्गदर्शन केले.