कोल्हापूर : बालकामगार कायदे सक्षम आहेत; पण त्याची अंमलबजावणी ताकदीने होत नसल्याने सध्या समाजातील विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. बालकामगारमुक्तभारत होण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून, कायदा दुरुस्तीत उद्योगपती सरकारवर दबाव टाकतील का? याची चिंता वाटत असल्याचे प्रतिपादन निवृत्त जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले. ‘अवनि’चे पथदर्शी काम असून, सरकारचे काम ही संस्था करीत असल्याचे गौरवोद्गार ही त्यांनी यावेळी काढले. ‘अवनि’च्या ‘प्रकाशाची वीस वर्षे’या स्मरणिकेचे प्रकाशन व विविध मान्यवरांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कॅनडा सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी होते. यावेळी लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, समाजाच्या बधिरतेमुळे बालकामगारांची संख्या वाढत आहेत. सोलापूर जिल्ह्यात आजही जास्त विडी वळणाऱ्या महिलांना चांगली स्थळे येतात. गरिबी हे जरी बालमजुरीचे प्रमुख कारण असले, तरी भारतीयांच्या मानसिकतेमुळे हे प्रमाण वाढत आहे. घरात ज्या चैनीच्या वस्तू हाताळतो, त्यामागे बालकामगारांचे श्रम व रक्त सांडले, याचा विसर आपणाला पडतो. ‘जो शाळेत जात नाही तो बालकामगार’ या शांता सेन यांच्या मताशी आपण सहमत असून, केंद्राने ‘आरटीई’ कायदा आणला; पण त्याचा वापर होत नाही. शाहू महाराजांनी जे काम शंभर वर्षांपूर्वी केले ते आज होत नाही. याला मतपेटीचे राजकारण जबाबदार असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘अवनि’ संस्था उत्पादित करणारे नागरिक घडवित असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. ‘अवनि’च्या कामाचे कौतुक करीत अनुराधा भोसले यांनी आपल्या कामाच्या बळावर संपूर्ण देशात नावलौकिक केल्याचे डॉ. जगन्नाथ वाणी यांनी सांगितले. अनुराधा भोसले यांनी प्रास्ताविकात वीस वर्षांच्या कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, हणबरवाडी (ता. करवीर) येथे संस्थेच्या मुलीसाठी बालसंकुलाचे भूमिपूजन डॉ. वाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेला मदत करणाऱ्यांचा ‘कृतज्ञता सत्कार’ करण्यात आला. स्कॉट तपोरा, प्रा. अरुण चव्हाण, अरुंधती महाडिक, डॉ. सूरज पवार, अरुण नरके, प्रफुल्ल शिरगावे, गणी आजरेकर, संजय पाटील, आदी उपस्थित होते.
बालकामगारमुक्तीसाठी इच्छाशक्तीची गरज
By admin | Published: December 06, 2015 1:32 AM