अमर पाटील : कळंबा
४३ वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अंबाई जलतरण तलावाचे रूप एक कोटी वीस लाखांच्या पुनर्विकास योजनेतून बदलणार असून, ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव माफक फीमध्ये उभा राहून जलतरणपटू तसेच खेळाडूंचा वनवास संपणार हे निश्चित ७५:२५ योजनेअंतर्गत अंबाई जलतरण तलावाचा विकास होणार असून, एक कोटी २० लाखांपैकी शासन निधी ९० लाख, तर पालिका निधी ३० लाख असणार आहे. सद्याचा १५ मीटर रुंद व ३३ मीटर लांब तलाव २५ मीटर लांब व ५० मीटर रुंद होणार आहे. जुन्या तलावाची पाणी खोली सात मीटर आहे, ती आता सर्वत्र समान १.५ मीटर असणार आहे. पुनर्विकासात नवीन भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त कार्यालय, मॅनेजर केबिन, प्रथमोपचार केबिन, स्टोअर रूम, प्रेक्षकांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, स्वतंत्र पुरुष, महिलांचे शॉवर व स्वच्छतागृहे असणार आहेत. पारंपरिक फिल्टरेशन प्लांट बदलून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. दहा स्टारटिंग ब्लॉक, लाईफ सेव्हिंग साधने, लेन मार्किंग, लेन सेप्रेटर लॅडर, तिकीट खिडकी, आदी सुविधांचा समावेश असणार आहे. ऑलिम्पिक दर्जाचा तलाव उभा करताना शासनाने पालिका कारभारावर अंकुश ठेवला आहे. तलावावर शासन क्रीडाशिक्षक नियुक्त करणार असून, क्रीडा बाबींखेरीज अन्य करणांसाठी तलावाचा वापर होणार नाही. शासकीय स्पर्धेसाठी मोफत, तर नागरिकांसाठी अल्प फीमध्ये तलाव उपलब्ध होणार आहे. सेवा-सुविधांचा खर्च पालिकेस पाहावा लागणार असून, बांधकाम अंदाजपत्रकात वाढ झाल्यास पालिकेस आर्थिक उपाययोजना करावी लागेल. ऑलिम्पिक दर्जाच्या तलावाचे काम पूर्णत्वास गेल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कोल्हापूरची कीर्ती पसरणार असून, २०१७ पासून प्रशासकीय ताकतुंब्यात अडकलेल्या कामास गती मिळावी यासाठी आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. शासन व पालिका निधीतून क्रीडाविश्वास उभारी देणारा हा प्रकल्प असल्याने सामूहिक प्रयत्नांची आता गरज आहे. श्रेयवादाचे राजकारण नको. अंबाई जलतरण तलावाच्या पुनर्विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी त्यावेळी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केला, परंतु पालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असल्याने एकाच विकासकामांचे दोन वेळा नारळ फोडण्यासाठीचे श्रेयवादाचे राजकारण गाजले होते. आता किमान श्रेयवाद बाजूला सारून तलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे आहे.