चंदगड : दौलत कारखाना विकत घ्यायला बरेच लोक तयार आहेत; पण बंद कारखाना चालू करायला कोणीही पुढे येत नाही. ही चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांची व कामगारांची शोकांतिका आहे. न्यायालयीन आणि रस्त्यावरील दोन्ही लढाया एकाचवेळी लढण्याची वेळ आहे. यासाठी सर्वांनी वेळ काढून दौलत हे घरचे कार्य समजून एकत्र येण्याचे आवाहन आजरा कारखान्याचे संचालक प्रा. सुनील शिंत्रे यांनी केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील कारखाना कार्यस्थळावर दौलत बचाव संघर्ष समितीच्यावतीने बोलावण्यात आलेल्या शेतकरी, कामगार मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सुभाष जाधव होते.विजय पाटील यांनी प्रास्ताविक करून केवळ राजकारणासाठी दौलतचा वापर करणारे व सत्ता भोगणाऱ्यांनी शेतकरी व कामगारांना दु:खाच्या खाईत लोटले आहे. त्यांना आता त्यांची जागा दाखविण्याची वेळ आल्याचे सांगितले.प्रा. शिंत्रे पुढे म्हणाले, रस्त्यावरील चळवळ उभी केली, तर त्याला ठरावीक वेळेत यश आले पाहिजे, अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जनआंदोलन उभे राहिल्यास एव्हीएच हटेल व दौलत सुरू होईल. यासाठी आपले सर्व स्तरावर सहकार्य असल्याचे सांगितले.यावेळी प्रा. सुभाष जाधव म्हणाले, दौलतच्या संचालक मंडळाला कारखाना सुरू करण्यासाठी भरपूर संधी दिली. त्यांच्यावरून गेल्या चार वर्षांत काहीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वेगळी रणनीती ठरवावी लागेल. केंद्रीय कृषीमंत्री, केंद्रीय सचिव व सहकारमंत्री यांची भेट घेऊन दौलतवर प्रशासक आणण्यासंदर्भात विचार करावा लागणार आहे. दिलेला प्रशासक हा शेतकरी व कामगारांचा विचार करणारा असावा. आजी-माजी संचालकांची चौकशी करून त्यांच्यावर कर्जाची जबाबदारी निश्चित करून फौजदारी दाखल करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून आमदार, खासदार यांचेही सहकार्य घेऊ, असे सांगितले. यावेळी आंदोलन किंवा संतप्त झालेल्या कामगार व शेतकऱ्यांनी आणखी किती वर्षे आंदोलन करायचे? ज्यांनी दौलत लुटली ते दौलतकडे ढुंकूनही बघायला तयार नाहीत. ते उजळमाथ्याने समाजात फिरत आहेत. त्यांना दहशत दाखवून राजीनाम्याला प्रवृत्त करावे लागेल, असे मत हणमंत पाटील, दत्तू कडोलकर यांनी मांडले. यावेळी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न डॉ. जाधव यांनी करताच अॅड. संतोष मळवीकर यांनी त्यांना विरोध करत गांधी मार्गाने आंदोलन करून ‘दौलत’चा प्रश्न सुटणार नाही, तीन वर्षे आंदोलन करूनही निर्ढावलेले संचालक मंडळ दौलत सुरू करण्याला असमर्थ ठरले आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणे हे पहिले काम आहे. गोपाळराव पाटील व संचालकांनी शनिवारपर्यंत राजीनामे न दिल्यास सोमवारी त्यांच्या घरी जाऊन किंवा कोठेही भेटतील तेथे राजीनामे घेऊया, असे सांगताच त्याला कामगार व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी एस. एम. कोले, नारायण धामणेकर, दिवाकर पाटील, कृष्णा रेगडे, प्रा. आबासाहेब चौगुले यांनीही मार्गदर्शन केले. कॉम्रेड आण्णा शिंदे, सतीश सबनीस, शिवसेना तालुकाप्रमुख महादेव गावडे, प्रभाकर खांडेकर, जे. जी. पाटील, अर्जुन कुंभार, धोंडिबा रोकडे, सुरेश हरेर, महादेव फाटक, आदी उपस्थित होते.
‘दौलत’साठी एकत्र येण्याची गरज
By admin | Published: March 01, 2015 11:46 PM