कोल्हापूर : समाज प्रबोधनात लहान लहान फिल्मसद्वारा व्हॉटस्अप, फेसबुक यावरून प्रबोधनात्मक विचार रुजविण्यासाठी लघुपटांची निर्मिती आवश्यक नव्हे, तर काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. कोल्हापुरातील गुणवंत कामगार सेवा संघ आणि परिवर्तन कला फौंडेशन यांच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे सोमवारी आयोजित ‘ परिवर्तन लघुपट महोत्सव २०१६’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, कामगार जो की शॉर्टफिल्मसारख्या प्रबोधनाच्या माध्यमांपासून दुर आहे. परंतु, त्याला आणि कलावंतांच्या फळीला एकत्र घेऊन सामाजिक विचार रुजविण्याचे काम सुरू आहे. याकडेही डोळेझाक करून चालणार नाही. लघुपटांची निर्मिती आणि समाजप्रबोधन या दोन गोष्टींना जोडूनच पहायला हवे. प्रमुख पाहुणे मनुग्राफ इंडस्ट्रीजचे सरव्यवस्थापक शैलेश शिरगुप्पी म्हणाले, कामगार हा घामाने देशाला समृद्ध करतो. त्याचे प्रबोधन होणे हेच परिवर्तनाच्या दिशेने पहिले पाऊल आहे.किरणसिंह चव्हाण दिग्दर्शित ‘ याकुब’ या लघुपटाचे प्रदर्शन झाले. सूत्रसंचालन व संयोजन कामगार कल्याण केंद्राचे संचालक संघसेन जगतकर यांनी केले. यावेळी अभिनेता स्वप्निल राजशेखर, हर्षल सुर्वे, कामगार कल्याण अधिकारी अरुण लाड, दिलीपदादा जगताप, गुणवंत कामगार सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश केसरकर, चित्रपट समीक्षक अनमोल कोठाडिया, कपिल मुळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाज प्रबोधनासाठी लघुपटांची निर्मिती काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2016 12:05 AM