कोल्हापूर : संविधानातील मूल्ये नव्या पिढीत पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून रुजविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. स्त्री, पुरुष व तृतीयपंथियांना समान हक्क आणि अधिकार मिळाले पाहिजेत, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी शनिवारी केले.
येथील शाहू स्मारक भवनात कल्पतरू वेल्फेअर सोसायटीच्यावतीने भारतीय संविधानातील कलमे-अंमलबजावणी आणि समाजाची जबाबदारी या विषयावर आयोजित परिसंवादात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र कुंभार होते. यावेळी प्राचार्य डाॕॅ.जी. एच. आळतेकर यांच्या ‘कोल्हापूर जिल्ह्यातील दलित चळवळीचा इतिहास’ व ‘कोल्हापूर जिल्ह्यातील दलित-राजकीय, सामाजिक परिवर्तन’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले.
यावेळी कोकाटे यांनी आरक्षण हा मागास घटकांचा अधिकार असून जोपर्यंत समता प्रस्थापित होत नाही तोपर्यंत आरक्षण ठेवावेच लागेल. असे मत मांडले. यानंतर ॲड. सूर्याजी पोटले यांनी संविधानानुसार लोकशाहीत लोकांचे राज्य असते. परंतु लोकांनी शिक्षण, आरोग्य, शेती व रोजगार या संदर्भात सत्ताधा-यांना प्रश्न विचारले पाहिजेत, यावरच इथून पुढे चळवळीची दिशा असली पाहिजे, असे आवाहन केले.
ज्येष्ठ विचारवंत राजाभाऊ शिरगुप्पे यांनीही विचार व्यक्त केले. यावेळी संविधानातील कलमे मुखोद्गत असणा-या अनुप्रिया गावडे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. सोसायटीचे अध्यक्ष रमाकांत घोलप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रकाश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. आभार प्रा. नीलेश घोलप यांनी केले.
--
फोटो नं २००३२०२१-कोल-श्रीमंत कोकाटे
ओळ : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी आयोजित परिसंवादात डॉ. श्रीमंत कोकाटे यांनी विवेचन केले. यावेळी डॉ. जी. एच. आळतेकर, ॲड. सूर्याजी पोटले, प्रा. डॉ. राजेंद्र कुंभार, रमाकांत घोलप, राजाभाऊ शिरगुप्पे, प्रा. प्रकाश नाईक उपस्थित होते.