कोल्हापूर : आपण ऐतिहासिक आणि पौराणिक कथा ऐकत मोठे झाले, त्या संस्कारात वाढलो. त्यामुळे ऐतिहासिक घटनांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करताना त्यातील प्रतिमांना धक्का न लावता मर्यादेचे भान राखा असा सल्ला ज्येष्ठ दिग्दर्शक सुभाष घई यांनी गुरूवारी दिला.कोल्हापुरातील शाहु स्मारक भवनात आयोजित कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी कलामहर्षि बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, सचिव दिलीप बापट उपस्थित होते.सुभाष घई म्हणाले, चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे नव्हे तर जागृतीचे सशक्त माध्यम आहे. भारतीय संस्कृतीत मर्यादा आणि संस्कांचे अनन्य साधारण महत्व असल्याने आपला देश विविधतेने नटला आहे. व्यक्ती, जाती, धर्म आणि विचारांची भिन्नता असणे स्वाभाविक आहे.
दिग्दर्शक एक कथा चित्रपटातून रसिकांपुढे मांडत असतो. पण ती कथा जेंव्हा इतिहासातील सत्य घटनेवर आधारित असते तेंव्हा वैयक्तिक न राहता समाजावर परिणामकारक असते. त्यामुळे सत्य घटना सांगण्यासाठी मनोरंजनांचा आधार घेतला गेला किंवा दिग्दर्शकाने स्वत:ची कल्पना त्यात वापरली तरी ती एका मर्यादेत राहिली पाहीजे.
आपल्या कलाकृतीमुळे एखाद्याचे समाधानच होणार नसेल तो विषयच हाताळू नये. मात्र लोकही चित्रपट पाहण्याआधीच तर्क आणि निर्णय लावून मोकळे होतात. प्रत्येक क्षेत्रात चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. चांगले चित्रपट यादगार बनतात.युट्युबसारख्या सोशल मिडियावर थेट प्रसारित होणाऱ्या चित्रपटांबद्दल ते म्हणाले, हे माध्यमे तर चित्रपटांचे भविष्य आहेत. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण कलाकृती जगासमोर नेऊ शकतो. माध्यम कोणताही असो त्याचा महोत्सव झाला पाहीजे. रसिकांना, अभ्यासकांना आणि यात करिअर करू इच्छिणाऱ्यांना त्याचे ज्ञान मिळाले पाहीजे.
राम गबाले माझे गुरू...यावेळी त्यांनी कोल्हापूरबद्दल विशेष कोतुकोदगार काढले. ते म्हणाले, मी व्ही. शांताराम यांचे चित्रपट पाहत मोठा झालो. राम गबाले हे तर माझे गुरू होते. मी या क्षेत्रात प्रगती करू शकलो त्यात मराठी चित्रपटांचा मोठा वाटा आहे.
भारतीय सिनेमात कलामहर्षि बाबूराव पेंटर यांच्यासह अनेक कोल्हापूरकरांनी मोलाचे योगदान दिले आहे. आजच्या पिढीला याबद्दल अज्ञान आहे, त्यांना पुन्हा या क्षेत्राकडे वळवायचे असेल तर किफ्फ सारखे चित्रपट महोत्सव झाले पाहीजे. मी आजवर तीन मराठी चित्रपट बनवले आहेत त्यातील संहिता या किफ्फमध्ये प्रदर्शित होत आहे.
स्वत:मधले गुण ओळखा..यावेळी झालेल्या कार्यशाळेत त्यांनी तरुणाईला स्वत:मधील गुण ओळखून करीअरची वाट निवडण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, शाळा, महाविद्यालयांमधले पुस्तकी ज्ञान मिळाले की चांगली नोकरी मिळते यासाठी शिकू नका, तर त्यासोबत कलेचे कौशल्यही आत्मसात करा.
आवडीच्या क्षेत्रात सिनेमा पाहिले की मुलं बिघडतात या विचारसरणीच्या सामान्य कुटूंबातून मी या क्षेत्रात आलो आणि यशस्वी झालो. त्यामुळे स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. शॉर्टकटने काहिही मिळणार नाही. यश मिळवण्यासाठी संघर्ष करावाच लागेल.