सरुड : लोकमत न्यूज नेटवर्क :
समाजाला वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ बनविण्याची ताकद वाचनालयामध्ये आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गावोगावी वाचन संस्कृती रुजविण्यासाठी वाचनालयांची गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरुडकर यांनी केले.
थेरगाव (ता. शाहूवाडी) येथे राजर्षी शाहू वाचनालयाच्या वतीने आयोजित, राजर्षी शाहू साहित्य गौरव व ग्रंथमित्र पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख व ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, युनियन बँकेचे निवृत्त महाप्रबंधक रमाकांत घोलप हे प्रमुख उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत रेडकर यांनी केले .
डॉ . रणधीर शिंदे म्हणाले, सामाजिक बांधीलकीतुन ग्रामीण भागात राजर्षी शाहू वाचनालयाचे वाचन संस्कृती मजबूत करण्यासाठी सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आहे. यावेळी रमाकांत घोलप, प्रा. प्रकाश नाईक यांनीही मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी प्रा. विष्णू शिंदे (शिवार कथासंग्रह), डॉ. श्रीकांत पाटील (लॉकडाऊन कादंबरी), प्रा. डॉ. संभाजी बिरांजे (छ. राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समग्र पत्रव्यवहार संशोधनात्मक ग्रंथ), विश्वास सुतार (तुकाराम नावाचा संत माणूस चरित्र ग्रंथ), प्रा. चंद्रशेखर कांबळे (शेणाला गेलेल्या पोरी कविता), दिवंगत बाबूराव रोकडे ( जसं घडलं तसं आत्मचरित्र) यांना साहित्य गौरव, तर प्रवीण महाजन (नंदुरबार) यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथमित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास सरपंच शीतल घोलप, उपसरपंच स्वप्ना पाटील, वाचनालयाचे उपाध्यक्ष तानाजी चौगुले, आदींसह ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन सुभाष सुतार यांनी केले. आभार सचिव शरद रेडेकर यांनी मानले.