ज्योतीप्रसाद सावंत- आजरा शहरामध्ये असणारी नाट्यचळवळ, सांस्कृतिक व सामाजिक कामाची पार्श्वभूमी, मोठ्या समारंभासाठी जागेअभावी होणारी कुचंबणा व केवळ गैरसोय टाळण्याकरिता गडहिंग्लज व कोल्हापूर येथे पार पडणारे विवाह समारंभ, या बाबींचा विचार केल्यास आजरा शहरामध्ये सर्वसोयीनियुक्त अशा प्रशस्त बंदिस्त बहुउद्देशीय सभागृहाची गरज भासत असून, व्यक्ती अथवा एखाद्या सामाजिक, सहकारी संस्थेच्या माध्यमातून सभागृह उभारण्याची मागणी होत आहे.आजरा शहराला नाट्यचळवळीची परंपरा आहे. आजरेकरांनी ही परंपरा टिकवून ठेवली आहे. गेल्या वर्षापासून आजरा येथे सुरू करण्यात आलेल्या रमेश टोपले स्मृतिप्रीत्यर्थ नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून सादर केल्या जाणाऱ्या नाटकांव्यतिरिक्त इतरवेळी केवळ सभागृहाच्या (नाट्यगृहाच्या) अभावामुळे येथे व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होऊ शकत नाहीत.शहरात असणाऱ्या भाजी मंडईचा वापर खुले नाट्यगृह म्हणून केला जात असला तरी या नाट्यगृहाचा वापर आठवडा बाजाराच्या दिवसाव्यतिरिक्त करावा लागतो. केवळ राजकीय पक्षांच्या सभांपुरताच याचा वापर होताना दिसतो. आजरा हायस्कूल येथे अण्णा-भाऊ सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे; पण या सभागृहामध्ये नाटकाचे प्रयोग करणे अशक्य आहे. जी अवस्था नाट्यप्रयोग अथवा इतर मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची आहे, तीच अडचण इतर कार्यक्रमांबाबतही आहे.विद्याधन कॉम्प्लेक्सवर जे. पी. नाईक सभागृह बांधण्यात आले आहे. परंतु या सभागृहाचे जिणे चढून जाताना वयोवृद्ध मंडळींची चांगलीच दमछाक होते. या सभागृहात वीजपुरवठा नाही, स्वच्छतागृह नाही, की पार्किंगही नाही; त्यामुळे बऱ्याचवेळा याचा वापर एखाद्या सहकारी संस्थेची वार्षिक सभा किंवा ‘सेल’ विक्रेत्यांकरिताच होताना दिसतो.आजरा येथील श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराच्या शिवाजीराव सावंत सभागृहाची आसन मर्यादा दोनशेच्यावर नाही. याठिकाणी रस्त्यावरच पार्किंग करण्याशिवाय पर्याय नाही. येथे लिंगायत समाजाचे दुरदुंडेश्वर मंगल कार्यालय आहे. परंतु येथेही मोठे समारंभ घेताना पार्किंगसह अनेक मर्यादा येताना दिसतात.लग्नसमारंभासारखे कार्यक्रम घेण्याकरिता सर्रास शाळांच्या मैदानाचा वापर केला जातो. परंतु, रविवार अथवा सुटीच्या दिवशीच हे कार्यक्रम शालेय कामकाजात व्यत्यय न आणता घेणे बंधनकारक राहते.या पार्श्वभूमीवर आजरा शहरामध्ये पार्किंगच्या सुविधेसह सर्व सोयीनियुक्त अशा बंदिस्त स्वरूपातील बहुउद्देशीय सभागृहाची प्रकर्षाने गरज भासत आहे. एखाद्या सामाजिक अथवा सहकारी संस्थेने पुढाकार घेतल्यास ही गरज पूर्ण होऊ शकते.केवळ सभागृहाअभावी...सर्वसोयीनियुक्त सभागृह, कार्यालय आजरा शहरात नसल्याने मोठ्या स्वरूपात होणाऱ्या विवाहांसारख्या कार्यक्रमासाठी जवळच असणाऱ्या गडहिंग्लज अथवा कोल्हापूरसारख्या शहरांना प्राधान्य दिले जाते.
आजऱ्यात बहुउद्देशीय सभागृहाची गरज
By admin | Published: December 28, 2015 12:07 AM