शिये (ता. करवीर) येथील हनुमाननगर उपनगरातील शिये-बावडा या मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या ओपन स्पेसवर क्रीडांगण व बाग होण्याची गरज असून, क्रीडांगणाअभावी खेळाडूंची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने ही जागा विकसित न केल्यास भविष्यात या मोक्याच्या जागेवर अतिक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील हनुमाननगर हे उपनगर शिरोली औद्योगिक वसाहतीला लागून असल्याने गेल्या पंधरा वर्षांत हा परिसर मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे. तरुणांना खेळण्यासाठी क्रीडांगण, वृद्धांना विरंगुळ्यासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शिये-कसबा बावडा या मुख्य रस्त्यालगत ग्रामपंचायतीची सुमारे तीन एकर जागा आहे. ही मोकळी जागा विकसित करून त्या जागी क्रीडांगण व बाग उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
येथील स्मशानभूमीजवळील गायरान जमिनीवर वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. ग्रामपंचायत व स्थानिक मंडळांनी एकत्रित येऊन या मोकळ्या जागेवर क्रीडांगण व वृक्षारोपण करून ही जागा सुशोभीकरण करून तारेचे कंपाउंड केल्यास भविष्यात या मोकळ्या जागेचा उद्भवणारा अतिक्रमणाचा विषय मिटण्यास मदत होणार आहे.
प्रतिक्रिया १: क्रीडांगण किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून दिल्यास ओपन जीमसाठी निधी उपलब्ध करून देऊ.
मनीषा कुरणे, जिल्हा परिषद सदस्या
२: क्रीडांगणासाठी सरपंच, उपसरपंच यांच्याशी चर्चा करून ग्रामपंचायतमार्फत जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून आमदार फंडातून यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न करू.
तेजस्विनी पाटील, शिये ग्रामपंचायत सदस्या.
३: खेळाडूंना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही, वृद्धांना विरंगुळ्यासाठी जागा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ग्रामपंचायतीने मोकळी जागा विकसित करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी.
पोपट काशीद, शिये ग्रामस्थ.
फोटो ओळ
शिये-बावडा या रस्त्यालगत असणाऱ्या शिये ग्रामपंचायतीच्या या रिकाम्या जागेवर क्रीडांगण व वृद्धांना विरंगुळ्यासाठी जागा विकसित करण्याची नागरिकांची मागणी आहे. (फोटो . हरी बुवा )