निपाणी : सत्य, संयम आणि अहिंसा यांबाबत जैन समाजाला तत्त्वांची देणगी आहे. त्यामुळेच देशबांधव सुखी, समाधानी जीवन जगत आहेत. जगाच्या तुलनेत भारत देश जैन तत्त्वे आणि सिद्धांतामुळे आपले वेगळे अस्तित्व टिकवून आहे. म्हणूनच जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला खरी गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावचे जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी केले.सदलगा येथे शाकाहार, अहिंसा, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती, सद्भावना रॅलीचे उद्घाटन करून ते बोलत होते. प्रारंभी सदलगा हायस्कूलमध्ये धर्मध्वजवंदन आणि शांतिमंत्रपठण झाले. सद्भावना रॅलीमध्ये बाळासाहेब पाटील याच्या हस्ते शांतिकलशाचे पूजन झाले; तर प्रकाश पाटील यांच्या हस्ते शांतिरथाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी खासदार प्रकाश हुक्केरी म्हणाले, शांतिसागर महाराज पुण्यतिथीचा कार्यक्रम हा इतिहास आहे. याठिकाणी कायमस्वरूपी काम करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. जैन समाजाची तत्त्वे वेगळी असून त्यामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. भर पावसातही सद्भावना रॅलीत हजारो श्रावक-श्राविका सहभागी झाल्या होत्या. रॅलीमध्ये विविध भागांतील जैन मुनी संघ, दयोदय जीवरक्षा केंद्र, झाडे लावा, झाडे जगवा, गोमटेश मस्तकाभिषेक, आधुनिक शेतीप्रयोग, राष्ट्रीय एकात्मता, जय जवान-जय किसान, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव असे ॅविविध ऐतिहासिक देखावे सादर करण्यात आले.कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, अण्णासाहेब गुंडकल्ले, रावसाहेब कुन्नुरे, पापा पाटील, सदाशिव वाळके, संजय गोपलकर, सागर चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जैन समाजाच्या तत्त्वांची देशाला गरज
By admin | Published: August 29, 2014 12:52 AM