कोल्हापूर : नागरिकत्व पडताळणी, रामजन्मभूमी खटला, गोवंश, काश्मीरमधील कलम ३७० या देश ढवळून काढणाऱ्या घटना घडत असताना, निधर्मीवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या हमीद दलवाई यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. आजच्या या संकटकाळात त्यांच्या निधर्मी विचारांच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे, अशी मांडणी ज्येष्ठ पत्रकार व अभ्यासक विनय हर्डीकर यांनी केली.
धर्मनिरपेक्षतेच्या आधाराने समाजसुधारणेसाठी दलवाई यांनी मांडलेले विचार केवळ मुस्लिमच नव्हे तर हिंदुधर्मियांनाही लागू पडतात. त्यांचे हे विचार विद्यापीठातील चर्चासत्राच्या सीमारेषा ओलांडून बाहेर नेले पाहिजेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ‘हमीद दलवाई यांचे साहित्य आणि समाजकार्य’ या विषयावर शिवाजी विद्यापीठात ‘भाषा भवन’मध्ये दोनदिवसीय चर्चासत्र आयोजित केले आहे.
हर्डीकर म्हणाले, ‘दलवाई यांनी केवळ मुस्लिम धर्मातील व्यंगांवर बोट ठेवले असे नाही, तर त्यांनी धर्माच्या नावाने जे काही चालते, त्याला विचारानेच आव्हान दिले.
दलवाई अभ्यासक्रमात का नाहीत?
राजन गवस म्हणाले, ‘अलीकडे पुरोगामी, निधर्मी, धर्मनिरपेक्षता यांची यथेच्छ टिंगल केली जात असताना दलवाईंची प्रकर्र्षाने आठवण येते. दलवाई आणि सूफी यांचे नाते तपासण्याची गरज आहे. त्यांचे कार्य आणि साहित्य अभ्यासमंडळावर का आले नाही, अशी खंतही व्यक्त केली.